भूम : छावण्यांना लावण्यात येणारा दंड माफ करावा, दिले जाणारे अनुदान वाढवावे यासह इतर मागण्यांसाठी छावणी चालकांनी ५ एप्रिलपासून चारा तसेच दैनंदिन रिपोर्ट देणे बंद केले जाईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार पहिल्याच दिवशी २७ छावणी चालकांनी चारा तसेच दैनंदिन रिपोर्ट दिला नाही. त्यामुळे प्रशासन याबाबत काय तोडगा काढते याकडे लक्ष लागले आहे. भूम तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत ४३ चारा छावण्यांच्या माध्यमातून ५० हजार पशुधन जगविले जात आहेत. यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या चारा छावण्या प्रशासनाच्या परवानगीनुसार सध्या सुरु आहेत. अशा परिस्थितीत मागील तीन महिन्यांपासून तालुक्यातील चारा संपुष्टात आला आहे. त्यामुळे जास्तीचे पैसे मोजून इतर जिल्ह्यांतून चारा आणावा लागत आहे. मार्च महिन्यात बहुतांश जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अशा अडचणींचा सामना करून छावण्या चालविल्या जात असतानाच प्रशासनाकडून वेगवेगळी कारणे पुढे करीत ४३ छावण्यांना दंड केला जात असल्याचे छावणी चालकांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या या धोरणाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत छावणी चालकांनी पत्रकार परिषद घेऊन ५ एप्रिलपासून चारा आणि दैनंदिन रिपोर्ट पाठविणे बंद करण्यात येईल, असा इशारा दिला होता. दरम्यान, प्रशासनाकडून ठोस पाऊले न उचलली गेल्याचा आरोप करीत मंगळवारी ४३ पैकी २७ छावणी चालकांनी चारा तसेच दैनंदिन रिपोर्ट पाठविणे बंद केले आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत आता काय निर्णय घेते हे पाहणे औैत्सुक्याचे ठरणार आहे. (वार्ताहर)
२७ छावण्यांचा चारा अन् रिपोर्टही बंद !
By admin | Updated: April 6, 2016 00:55 IST