बीड : जिल्हा परिषदेत मंगळवारी २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी २६ कोटी रुपयांच्या तुटीच्या अर्थसंकल्पावर मंगळवारी सर्वसाधारण सभेच्या बैठकीत मंजुरीची मोहोर उमटविण्यात आली. तुटीच्या अर्थसंकल्पाची परंपरा यंदाही कायम राहिली. समाजकल्याण विभागाला सर्वाधिक एक कोटी २८ लाख तर शिक्षण विभागाला ६५ लाख रुपयांची तरतूद झाली. गतवर्षीच्या तुलनेत सर्वच विभागांच्या अंदाजित खर्चाला कात्री लावण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात दुपारी १ वाजता सभेला सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित हे होते. यावेळी जि.प. उपाध्यक्षा आशा दौंड, सभापती कमल मुंडे, बजरंग सोनवणे, महेंद्र गर्जे, सीईओ नामदेव ननावरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंदे्र यांची प्रमुख उपस्थिती होती. अर्थ व बांधकाम सभापती संदीप क्षीरसागर यांनी सभेपुढे अर्थसंकल्प ठेवला. तत्पूर्वी नवनिर्वाचित जि.प. सदस्या शोभा रावसाहेब देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. भाजपचे गटनेते मदनराव चव्हाण यांचे सदस्यत्व अपात्र ठरल्याने स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या जागी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रासपचे जि.प. सदस्य बालासाहेब दोडतले यांनी एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. त्यामुळे त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.२०१५- १६ मध्ये २८ कोटी ८० लाख १ हजार ५१ रुपये तुटीचा अर्थसंकल्प मंजूर केला होता. यावर्षी २६ कोटी ६४ लाख ८९ हजार ५१ रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर झाला. त्यामुळे गतवर्षीची २ कोटी १५ लाख २ हजार १०० रुपये एवढी तूट भरुन निघाली.२०१६-१७ मध्ये १० कोटी ८५ लाख ४५ हजार रुपये एवढे अपेक्षित उत्पन्न असून ८ कोटी ७० लाख ३३ हजार रुपयांच्या मूळ खर्चाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. दरम्यान, जि.प. चे उत्पन्न वाढविण्यासाठी गुंतवणुकीवर गतवर्षी ५ कोटी ६९ लाख ४५ हजार रुपये प्राप्त झाले. यावर्षी ४ कोटी ६० लाख रुपये अपेक्षित आहेत.बॅचबिल्ले अन् बॅगअर्थसंकल्पाची सभा असल्याने प्रत्येक सदस्याला बॅग देण्यात आली होती. त्यात अंदाजपत्रक पुस्तिका, पेन, डायरी होती. सदस्यांना बॅचबिल्लेही दिले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच मिनीमंत्रायात अर्थसंकल्पीय सभेचे वातावरण अनुभवले. (प्रतिनिधी)
२६ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प
By admin | Updated: March 23, 2016 01:09 IST