नांदेड: मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जिल्ह्यात आतापर्यंत २५१़३५ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे़ गत चोवीस तासांत सरासरी २२ मि़मी़ पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे़ यंदा झालेला पाऊस गत दोन वर्षातील निचांकी पाऊस असल्याचे आकडेवारी सांगते़ २५ आॅगस्टअखेर जिल्ह्यात केवळ १८२़५९ मिमी़ पावसाची नोंद झाली होती़ मात्र गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने ही आकडेवारी २५१़३५ मिमी़ पर्यंत पोहोचली आहे़ शुक्रवारी सायंकाळी व रात्री जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली़ यात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात ४५़२५ मिमी़ तर सर्वात कमी पाऊस नांदेड, मुदखेड तालुक्यात १३ मिमी़ झाला़ त्यापाठोपाठ बिलोली-२४़४०, देगलूर-२०, अर्धापूर- १७़६७, भोकर-१७, उमरी-१३़८७, कंधार-२३, लोहा-२३़६७, हदगाव-१६़४२, हिमायतनगर-२२़३३, देगलूर-२०, नायगाव-२४़८०, मुखेड-३०़७१ मिमी़ पावसाची नोंद झाली़ दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरु होता़ दुपारी तीन वाजेच्या सुमारास अर्धा तास चांगला पाऊस झाला़ पावसाअभावी अडगळीत पडलेले रेनकोट, छत्र्या यानिमित्ताने बाहेर पडल्याचे चित्र शहरात दिसून आले़ पोळा व गणेश चतुर्थीच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे सणोत्सवाच्या काळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे़ दोन दिवसांपासून पाऊस सुरु असला तरी यात जोर नसल्याने याचा फायदा पिकांना अथवा जलसाठे वाढीसाठी होणार नसल्याचे दिसून येते़ जलसंकट टळण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना आहे़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात २५१़३५ मि़ मी़ पाऊस
By admin | Updated: August 31, 2014 00:13 IST