अशोक कांबळे, वाळूज महानगरऔद्योगिक परिसरात काम करताना अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना कायम सतर्क राहावे लागते. आगीमुळे होणारी जीवित व वित्त हानी रोखण्यासाठी अनेकदा जीव धोक्यात घालावा लागतो; परंतु हा घटक कायम दुर्लक्षित राहिला आहे. २४ तास काम करूनही हजेरी मात्र, आठ तासांचीच लावली जाते. हक्कांच्या घरांचा प्रश्नही अजून प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत येत्या २६ एप्रिलपासून संपावर जाण्याची तयारी अग्निशामक दलातील कर्मचारी करीत आहेत. रयतराज कामगार संघटनेच्या माध्यमातून अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रशासनाच्या विरोधात एकत्र आले आहेत. सुटीच्या दिवशी केलेल्या कामांचा मोबदला मिळावा, भविष्य निर्वाह निधी द्यावा, कामाच्या वेळेचे नियोजन करावे, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात ते आहेत. कर्मचाऱ्यांसाठी सदनिका बांधण्याचे काम कंत्राटदार व प्रशासनातील वादामुळे अनेक वर्षांपासून रखडले आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या सदनिका अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अग्निशमन कर्मचारी हतबल झाले आहेत. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना ३१ मार्च रोजी मागण्यांचे निवेदन सादर केले, मात्र त्यावर कसलाही निर्णय झाला नाही. १२ एप्रिल रोजी प्रशासनाला पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. त्याचीही दखल घेण्यात आली नाही. येत्या २५ एप्रिलपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास २६ एप्रिलपासून वाळूज, शेंद्रा व पैठण औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दलाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. गरज चाळीसची, कार्यरत बाराचवाळूज औद्योगिक वसाहत आणि निवासी भाग, असे मोठे कार्यक्षेत्र असलेल्या अग्निशमन विभागात ४० कर्मचाऱ्यांची गरज असून, प्रत्यक्षात मात्र, बाराच कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येकी दोन फिडर फायरमन व चालक आणि ८ फायरमन यांचा यात समावेश आहे. यासंदर्भात मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारीक यांच्याशी संपर्क साधला असता, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचे विभागीय अधिकारी आर. बी. पाटील यांनी सांगितले. कर्मचारी संपावर गेले तर पर्यायी व्यवस्था करून सेवा दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२४ तास काम; हजेरी मात्र आठ तासांची
By admin | Updated: April 18, 2016 00:56 IST