पैठण : नाशिक विभागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी जायकवाडी धरणात १०,१८५ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. दरम्यान, दारणा धरणातून सायंकाळी विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीतील पाण्याची आवक बुधवारपासून दुप्पट होण्याची शक्यता दगडी धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. नाशिक विभागात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे दारणा आणि नांदूर मधमेश्वर धरणातून ३९,७६३ क्युसेक्स क्षमतेपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. पालखेड धरणातूनही दुपारपासून ३१,८०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यास प्रारंभ झाला आहे. हे पाणी बुधवारी दुपारनंतर जायकवाडीत दाखल होणार असल्याने जायकवाडीतील आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तरीही या भागात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.जायकवाडीच्या मृतसाठ्यात २.१७ टीएमसी वाढ झाली आहे. सध्या धरणातील मृतसाठ्यात ५२७.७५३ दलघमी जलसाठा आहे. धरण जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २१०.३४७ दलघमी पाणी लागणार आहे. वरील धरणातून येणारे पाणी लक्षात घेता धरणाचा मृतसाठा भरून निघेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकचे पाणी गोदावरीद्वारे मंगळवारी पहाटे नाथसागरात येऊन धडकले. सध्या गोदावरीतून पाणी १३,५८० क्युसेक्स क्षमतेने वाहत आहे.
जायकवाडीच्या मृतसाठ्यात २.१७ टीएमसीने वाढ
By admin | Updated: July 13, 2016 00:38 IST