हिंगोली : जिल्ह्यात सध्या सेतू सुविधा केंद्र बंद करण्यात आल्याने पुन्हा एकदा महा-ई-सेवा केंद्रांना चांगले दिवस आले आहेत. हळूहळू ही सेवा सुरळीत होत आहे. शिवाय लूट टाळण्यासाठी प्रशासनाने विविध प्रमाणपत्रांसाठीचे दरही जाहीर केले आहेत.हिंगोली जिल्ह्यात सध्या १३0 महा-ई-सेवा केंद्र कार्यान्वित आहेत. तर यापूर्वी कामच येत नसल्याने करार केलेला असताना जवळपास ३0 केंद्र बंद पडले होते. ते आता पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर नव्याने २५ ते ३0 केंद्रांचे करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास सर्वत्रच नजीकच महा-ई-सेवा केंद्राची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे. तरीही काही ठिकाणी अंतर वाढत असल्यास नवे केंद्र देण्यात येणार आहेत. किमान सर्कलनिहाय केंद्र असेल याची खात्री केली जाणार आहे. त्यामुळे हा आकडा २१५ केंद्रांपर्यंत जाणार आहे. शिवाय लूट टाळण्यासाठी हिंगोली तहसील कार्यालयाने दरपत्रकच जाहीर केले आहे. काही ठिकाणाहून तशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे आता लाभार्थीला अधिकचे दर कोणी लावल्यास त्यावर कारवाई होणार आहे. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी याबाबत माहिती दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
२१५ महा-ई-सेवा केंद्र सुरू होणार
By admin | Updated: September 16, 2014 01:30 IST