शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

शहरात २० टन ऑक्सिजन ‘वेटिंग’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी, ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ही परिस्थिती फक्त औरंगाबादेतच नसून ...

औरंगाबाद : कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी, ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ही परिस्थिती फक्त औरंगाबादेतच नसून राज्यभरात आहे. परिणामी ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. औरंगाबादला दररोज साधारण ६० ते ६१ टन ऑक्सिजनची गरज आहे. परंतु मंगळवारी ४० टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला असून, २० टन ऑक्सिजन रात्री उशिरा येण्याची चिन्हे आहेत. अनेक खासगी रुग्णालयांत केवळ बुधवारी दुपारपर्यंतचा साठा असल्याची स्थिती आहे. त्यामुळे रुग्णांची अन्य ठिकाणी व्यवस्था करण्याची सूचना देणे सुरूच आहे.

शहराला होणारा लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. लिक्विड ऑक्सिजनने भरलेला टँकर पूर्वी रुग्णालयांत उभा ठेवला जात असे. परंतु आता जेवढे रुग्ण आहेत, त्यानुसार पुरवठा केला जात आहे. शहरातील काही रुग्णालये ऑक्सिजन पुरेसे असल्याचा दावा करीत आहे, तर काहींकडे स्वत:चे ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहे. परंतु त्याच वेळी काही रुग्णालयांनी नवे रुग्णच घेणे बंद केले आहे. दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णांना अन्यत्र हलविण्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चिंतेने रुग्णांचे नातेवाईक अन्य रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी धाव घेत आहे. घाटीत ५०० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दररोज १६ ते १७ टन ऑक्सिजन लागत आहे. घाटीत १२५ खाटा वाढीच्या दृष्टीने नवीन टँक बसविण्यात येत आहे. अचानक रुग्ण वाढले तर त्यादृष्टीने नियोजन केले जाईल, असे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी सांगितले.

----

कोविडग्रस्तांवर उपचार करणारे रुग्णालये-६९

दाखल रुग्णांची स्थिती

व्हेंटिलेटरवर - ३०४

आयसीयू - ५८१

ऑक्सिजनवरील - १७०७

--------

जेवढी मागणी, तेवढा पुरवठा

काही रुग्णालयांत ऑक्सिजनची अडचण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. औरंगाबादची रोजची ६१ टन ऑक्सिजनची मागणी आहे. ४० टन ऑक्सिजनचा पुरवठा दुपारी झाला, तर २० टन ऑक्सिजन रात्री उशिरा येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. दररोज जेवढी मागणी आहे, तेवढा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे घाबरण्यासारखी परिस्थिती नसावी.

-डाॅ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हाॅस्पिटल असोसिएशन

--

अ‍ॅडमिशन बंद केले

उद्या दुपारपर्यंतच्या ऑक्सिजनची व्यवस्था झाल्याचे औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ऑक्सिजनच्या परिस्थितीमुळे अ‍ॅडमिशन बंद केले आहे. जे रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पण त्यांनाही कुठे जागा मिळाली तर जाऊ शकतात, असे त्यांना सांगितले आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील, याचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत नवीन रुग्ण घेणार नाही.

- डाॅ. प्रदीप बेंजरगे, कृष्णा हाॅस्पिटल

--------

एकच दिवसाचा साठा

ऑक्सिजनची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे रुग्णांना इतर ठिकाणी व्यवस्था करण्यासंदर्भात सूचना केली आहे. एकच दिवसाचा साठा आहे. १२५ रुग्ण आहेत. दोन दिवसांपासून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा मिळत नाही. सिलिंडर वापरले जात आहे.

-डाॅ. अश्विनीकुमार तुपकरी, डाॅ. हेडगेवार रुग्णालय

---

२४ तासांची दिली मुदत

डाॅ. हेडगेवार रुग्णालयात नातेवाईक ८ तारखेपासून दाखल आहे. २४ तासांचा ऑक्सिजन आहे, तुम्ही तुमची व्यवस्था करावी, असे रुग्णालयाने सांगितले. त्यामुळे इतर ठिकाणी चौकशी केली. पण कुठेच बेड उपलब्ध नाही. रुग्णालयानेच रुग्णांची व्यवस्था केली पाहिजे.

- रामविलास दरख, रुग्णाचे नातेवाईक

----------

खासगी रुग्णालयांचे अधिकारी म्हणाले...

एमजीएम रुग्णालयाचे डाॅ. प्रवीण सूर्यवंशी म्हणाले, सध्या कोणतीही अडचण नाही. मागणीप्रमाणे ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. कमलनयन बजाज रुग्णालयाच्या डाॅ. नताशा वर्मा म्हणाल्या, रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा सध्या सुरळीत आहे. सकाळीच ऑक्सिजनचे वाहन आले. पुढे काही परिस्थिती उद‌्भवण्याची शक्यता म्हटले जात आहे. त्यादृष्टीने तयारी केली जात आहे. मेडिकव्हर हॉस्पिटलचे डाॅ. संतोष यादव म्हणाले, सध्या ऑक्सिजन पुरवठा आहे. किती ऑक्सिजन येणार आहे, हे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे नवीन रुग्ण घेत आहोत. युनायटेड सिग्मा हास्पिटलचे डाॅ. अजय रोटे म्हणाले, सध्या ५० रुग्ण ऑक्सिजनवर आहे. रुग्णालयाचे तीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट असल्याने कोणतीही अडचण नाही. अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या डाॅ.भावना टाकळकर म्हणाल्या, २२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. रुग्णालयात तीन आठवड्यांपूर्वीच ऑक्सिजन जनरेटर मशीन बसविण्यात आले आहे. माणिक हाॅस्पिटलचे डाॅ. उल्हास कोंडपल्ले म्हणाले, ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. पण रुग्णालयाचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहे. खबरदारी म्हणून सिलिंडरही ठेवले जातात.