औरंगाबाद : अनेक वर्षांपासून विश्वासू नोकर म्हणून काम करणाऱ्या एक जणाने पेट्रोलपंप मालकास २ लाख ३६ हजार रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले. याप्रकरणी नोकराविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेख अमजद शेख गौस ऊर्फ राजू (४०, रा. सादातनगर, रेल्वेस्टेशन परिसर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, चिकलठाणा येथे दिलराज खलील चौधरी यांचा पेट्रोलपंप आहे. तर आरोपी हा त्यांच्या या पेट्रोलपंपावर रोखपाल म्हणून त्यांच्याकडे कामाला होता. चौधरी यांच्या अत्यंत विश्वासातील असलेल्या या आरोपीकडे पेट्रोल-डिझेल विक्रीतून येणारी रक्कम जमा ठेवली जात होती. त्यानंतर ती पंपचालकाच्या बँक खात्यात जमा केली जात असे. ११ आॅक्टोबर रोजी सायंकाळपासून ते १२ आॅक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत पेट्रोल आणि डिझेल विक्रीतून २ लाख ३६ हजार रुपये जमा झाले होते. ही रक्कम तक्रारदारांकडे जमा न करता शेख अमजद यांनी ती परस्पर गायब केली. विशेष म्हणजे याबाबत पंपमालकास कोणतीही माहिती न देता तो पंपावरून निघून गेला. ही बाब समोर येताच चौधरी यांनी दोन दिवस त्याचा शोध घेतला. मात्र, तो कोठेही आढळला नाही. शेवटी त्यांनी शेख अमजदविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात फिर्याद नोंदविली. सहायक फौजदार सांगळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
नोकरानेच लावला २ लाख ३६ हजारांचा चुना
By admin | Updated: October 17, 2016 01:19 IST