उस्मानाबाद : जिल्ह्यातील आजही हजारो कुटुंबिय कच्चा घरामध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांना हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी शासनाने आवास योजना सुरु केली. रमाई आणि इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्हाभरातील १९९८ लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळणार आहे. या घरकुलांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांची यादी लांबलचक आहे. २६ हजार २५३ जणांना हक्काच्या घरकुलाची प्रतीक्षा आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये यापैकी १ हजार २७६ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील २०५, तुळजापूर १९७, उमरगा १६९, लोहारा ७५, कळंब २४२, वाशी ७५, भूूम १५३ तर परंडा तालुक्यातील १६० जणांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांना प्रत्येकी ९५ हजार रुपये दिले जाणार आहेत. तर लाभार्थ्यांस स्ववाटा म्हणून ५ हजार रुपये भरावे लागणार आहेत. रमाई आवास योजनेंतर्गतही ‘लाभार्थ्यांची संख्या फारशी नाही. कारण या योजनेंतर्गत एका घरकुलासाठी केवळ ७० हजार रुपये दिले जात आहेत. बांधकाम साहित्याचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे या तोगड्या निधीमुळे घरकुलाचे काम होत नाही. परिणामी घरकुलांची कामे एकेक, दोन-दोन वर्ष रखडली जात आहेत. असे असतानाही २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हाभरातील ७२२ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील २१६, तुळजापूर २२५, उमरगा ४७, लोहारा ४७, कळंब ५०, वाशी ६९, भूम ३९ आणि परंडा तालुक्यातील २९ लाभार्थ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) इंदिरा आवास योजनेंतर्गतच्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. २५ हजारावर लाभार्थ्यांना पक्क्या निवाऱ्याची प्रतीक्षा आहे. मात्र उपलब्ध होत असलेल्या निधीचा विचार केला असता, प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना आणखी काही वर्ष प्रतिक्षेतच रहावे लागणार आहे. २०१४-१५ मध्ये २६ हजार २५३ पैकी १ हजार २७४ जणांनाच घरकुले मंजूर झाली आहेत.
१९९८ जणांना घरकुले मंजूर
By admin | Updated: July 16, 2014 01:26 IST