प्रताप नलावडे , बीडब्रिटीश आणि निजाम सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा उभारण्यात बीडच्या क्रांतिकारकांची भूमिका एकूण संपूर्ण मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात उल्लेखनीय राहिली आहे. १८५७ च्या उठावाआधी जवळपास ४० वर्षे आधी बीड जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी सशस्त्र उठाव केला होता.बीड जिल्ह्याने हैदराबाद मुक्ती संग्रामात सशस्त्र उठाव अनेकदा केले आहेत. या जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी केलेल्या उठावाची दखल अनेकदा ब्रिटीश सरकारलाही घ्यावी लागली होती. यासंदर्भात माहिती देताना इतिहासकार आणि हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम आणि बीड जिल्हा या ग्रंथाचे लेखक डॉ. सतीश साळूंके यांनी दिलेल्या माहितीनुसार १८१८ ला जिल्ह्यात धर्माजी प्रतापराव यांनी तरूणांची एक मोठी फौजच तयार केली होती. या सर्वांना बंदुक चालविण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. ब्रिटीश सरकारच्या विरोधातील पहिला सशस्त्र उठाव करण्याचे धाडस केले होते. अचानक सत्तेविरोधात झालेल्या या उठावामुळे ब्रिटीश सरकारलाही हादरा बसला होता. या उठावाने संतप्त झालेल्या ब्रिटीश सरकारच्या अधिकाऱ्यांनी ३१ जुलै १८१८ ला प्रतापराव यांना कटकारस्थानाने ठार मारले.असाच सशस्त्र लढा घोडेखुरची लढाई म्हणून इतिहासात प्रसिध्द आहे. केज तालुक्यातील शहाजी व धोंडीजी मुंडे या स्वातंत्र्यवीरांनी बीड सशस्त्र सैन्यदल उभा करून निजाम आणि ब्रिटीशांच्या विरोधात बंड पुकारले होते. या परिसरातील निजामधार्जिण्या श्रीमंतांना लूटून स्वातंत्र्य लढ्यासाठी आर्थिक मदत उभी करण्याचे मोठे काम यांनी केले होते. बीड जिल्ह्यातील घोडेखूर परिसरात सशस्त्र सैन्यदल तयार करण्यात येत असल्याची कुणकुण ब्रिटीश आणि निजाम सरकारला लागल्यानंतर त्यांनी अत्यंत घनदाट जंगलात असलेला हा परिसर चाफेर वेढला. यावेळी स्वातंत्र्यवीरांनी निजाम सरकारच्या सैन्यावर हल्ला चढवून त्यांना सळो की पळो केले होते.या कारनाम्याची दखल घेत मुंबईच्या ब्रिटीश अधिकाऱ्याने बीडच्या अधिकाऱ्याला एक खरमरीत पत्र लिहून आम्ही १८५७ चा उठाव दडपून टाकला आणि त्यापेक्षा हा उठाव मोठा आहे का, असा खोचक सवाल केला होता. घोडेखूरच्या मुंडे बंधूंची माहिती लोकमान्य टिळकांना मिळाल्यानंतर त्यांनी घरच्या घरी बंदुका तयार करण्याचे एक मशीन या दोघांना दिले होते.शिरूर परिसरातील कान्हा भिल्लाने मुक्तीसंग्रामात दिलेले सशस्त्र योगदानही उल्लेखनीय असेच आहे.४शिरूर परिसरात श्रीमंतांना लूटून हा पैसा स्वातंत्र्यलढ्यासाठी पुरविण्याचे काम तर या कान्हाने केलेच, परंतु त्याचवेळी त्याने सशस्त्र सैनिक तयार करण्याचे कामही केले.४निजाम सरकारच्या सैनिकांवर अनेकदा हल्ले चढविल्यानंतर चिढलेल्या निजाम सरकारने कान्हाला पकडून त्याला कडब्याच्या गंजीत घालून जाळण्याचा प्रयत्न केला. ४त्यातूनही तो चतुराईने वाचला, परंतु त्यानंतर त्याला कनकालेश्रवर मंदिराच्या मागील टेकडीवर निजाम सरकारच्या सैनिकांनी फासावर लटकविले.हैदराबाद मुक्तीसंग्रातील स्मरणात राहण्यासारखी पण आता सोयीस्करपणे विसरलेली एक घटना म्हणजे तीन तारखेची दंगल. रझाकारांनी बीडच्या बारादरीच्या इमारतीतील निजामकालीन न्यायालयात नऊ जणांना एकदाच फाशी दिली. ४डॉ. सतीश साळुंके सांगतात, ही घटना घडली ती बीड शहरातील बारादरी या ऐतिहासिक वास्तूत.४अहमदनगरच्या शूर सरदार सुल्तानजी निंबाळकरांच्या निवासस्थानासाठी ही वास्तू उभारली होती. निंबाळकर बीडमध्ये असताना या वास्तूत रहात. ४पुढे हैदराबाद संस्थानात बीड विलीन झाल्यावर निजामाने या वास्तूचे रुपांतर न्यायालयात केले. अनेक स्वातंत्र्य सैनिकांवर येथे खटले चालविण्यात आले. याच ठिकाणी बीड शहरातील नऊ तरुण स्वातंत्र्य सैनिकांना एकाचवेळी फासावर लटकाविण्यात आले होते. ४निजाम सरकारच्या विरोधात हिंदू- मुस्लिम बांधवांनी पुकारलेल्या ‘तीन तारखे’च्या दंगलीत एकाच वेळी बीड शहरात नऊ शूरवीरांना जुलमी रझाकारांनी फाशी देऊन अत्याचाराचा कळस गाठला. मात्र दुर्दैवाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होताना या महत्त्वपूर्ण घटनेचा अनेकांना विसर पडला.
१८५७ आधीच पेटल्या क्रांतीच्या मशाली
By admin | Updated: September 17, 2014 01:14 IST