औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी अद्याप सुटण्याची चिन्हे नसून आज १६ व्या दिवशी कांचनवाडी परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्र घेत कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून धरल्या. यावेळी आंदोलकांनी मनपा विरोधी जबरदस्त घोषणाबाजी केल्याने वातारण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
नारेगाव येथील कचरा डेपोविरोधात मांडकी, गोपाळपूर, वरूड आणि नारेगाव येथील ग्रामस्थांनी १६ दिवसांपासून आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे शहरातील सर्व कॉलन्यांमध्ये कचर्याचे ढीग साचले. त्यामुळे शहरात रोगराईला आमंत्रण मिळते आहे. या पार्श्वभूमीवर मनपाने दोन दिवसांपासून शहराच्या चार दिशांना मनपाच्या मालकीच्या जागेवर कचरा नेऊन टाकण्यास सुरुवात केली. यानुसार आज कांचनवाडीतील जागेवर कचरा टाकण्यासाठी मनपाची २० ते ३० वाहने गेली होती. गाड्या आल्याची कुणकुण लागताच येथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत या वाहनांना रस्त्यावरच रोखून धरले. यावेळी तेथे असलेले पोलीस व आंदोलक यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला.
पहा व्हिडीओ : कचरा प्रश्नावरुन औरंगाबाद कांचनवाडीमध्ये नागरिकांचा जोरदार विरोध
दरम्यान गुरुवारीसुद्धा या भागात आंदोलकांनी मनपाच्या गाड्या अडवल्या होत्या. यावेळी ट्रक अडविणार्या ६९ महिला आणि २० पुरुष आंदोलकांना बंदोबस्तावरील पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी धरपकड सुरू करताच उर्वरित लोकांनी अचानक दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत एस. टी. महामंडळाच्या दोन बसच्या काचा फुटल्या. तर एक मालवाहू ट्रक आणि कारवरही दगडफेक झाली. यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.