उस्मानाबाद : शासनाच्या पाणी व स्वच्छता मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार मिशन स्वच्छ भारत कार्यक्रमांतर्गत २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश निर्मल करण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात २५ सप्टेंबर ते २३ आॅक्टोबर या दरम्यान राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २ आॅक्टोबर रोजी ६२२ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा, १६८९ शाळा आणि १९०४ अंगणवाड्यांत स्वच्छतेची शपथ व दहा कलमी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधकाम व वापर करण्याबाबत माहिती देण्यावर अधिक भर राहणार आहे. यासाठी प्रत्यक्ष भेटी, स्वच्छता फेरी, विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा, संस्थास्तरावरील स्वच्छता सुविधा, किशोरवयीन मुलींची स्वच्छताविषयी बैठक, ात धुवा दिन साजरा करणे आदी उपक्रमांसोबतच अभियान कालावधीत शौचालय बांधलेल्या कुटुंबांचा सत्कारही करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी कळविले आहे. स्वच्छता कार्यक्रमात ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या एक लाख कुटुंबापर्यंत कुटूंब संपर्क अभियानाच्या माध्यमातून पोहोंचण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यात जिल्हा कक्षातील सल्लागार, विस्ताराधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आरोग्य सहाय्यक, आशा कार्यकर्ती आदींमार्फत दररोज पंधरा-वीस याप्रमाणे गृहभेटी देण्यात येणार आहेत. यादरम्यान कुटुंबियांकडून स्वच्छता संवाद पत्र भरून घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
१६८९ शाळांत घेणार स्वच्छतेची शपथ
By admin | Updated: October 1, 2014 00:47 IST