उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी मागील चार ते वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत नैसर्गित आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी, यासाठी गत वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी १५ कोटी ९७ लाख रुपयांचा विमा हप्ता भरून ३ लाख २२ हेक्टरवरील पिके संरक्षित केली होती. यापैकी ६ लाख २५ हजार शेतकऱ्यांना १५७ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.गतवर्षी उस्मानाबाद, लोहारा, वाशी, भूम, परंडा व उमरगा या तालुक्यात अल्प पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पुढील काळात पाऊस पडेल, या आशेवर अत्यल्प पावसावरच खरिपाची पेरणी केली होती. परंतु, पेरणीनंतरही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ या संकटांमुळे शेतकऱ्यांच्या हातून हा हंगाम गेला. या हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी ३ लाख २२ हेक्टरसाठी १५ कोटी ९७ लाख रुपयांचा विमा भरला होता. त्याची विमा संरक्षीत ५०१ कोटी ८१ लाख ऐवढी होती. मात्र, विमा कंपनीने ६ लाख २५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १५७ कोटी १३ लाख रुपयांचा विमा मंजूर केला आहे. त्यामुळे सव्वालाखावर शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यत कोणत्या तालुक्याला किती पीक विमा मंजूर झाला, याची माहिती अद्याप कृषी विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
१५७ कोटींचा पीक विमा मंजूर
By admin | Updated: May 20, 2015 00:18 IST