हिंगोली : सेनगाव तालुक्यात परजिल्ह्यातून बदलीवर आलेले १५ शिक्षक गायब झाले असून त्यांनी जिल्हा परिषदेत वजन वापरून सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात खुद्द सेनगाव पं.स.च्या सभापती शेषीकलाबाई पाटील, उपसभापती लक्ष्मीबाई गडदे यांनी तक्रार केली आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेल्या दोन वर्षापासून परजिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी तर जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांची संख्या अधिक असल्याचा प्रकार घडत आहे. यामध्ये मोठे अर्थकारण होत असून या बाबीकडे जिल्हा परिषदेतील अधिकारी कानाडोळा करीत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेले शिक्षक ज्या गावाच्या नावाने पदस्थापना मिळवितात, त्या गावी रुजू न होता, जिल्हा परिषदेत आर्थिक वजन दाखवून सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळवितात, अशी आतापर्यंत चर्चा होती. आता या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. सेनगाव तालुक्यात पर जिल्ह्यातून १५ शिक्षक जून २०१३ ते जून २०१४ या कालावधीत बदलीवर आले. त्यामध्ये चांदू गणपती लोंढे (नियुक्ती जि.प.शाळा कापडसिंगी), दीपक कदम (ब्रम्हवाडी), संतोष अंभोरे (उटी), गजानन भिसे (बन), कृष्णा गाढवे (बन), नागनाथराव काळे (डोंगरगाव), सतीश पुरी (धोत्रा), जाधव (खैरी), सुरेश बेंडे (जामदया), महेश वाघमारे (बरडा), शंकर शिंदे (बोडखा), राजेश काळबांडे (तांदुळवाडी), दशरथ कदम (मकोडी), अनिता जाधव (कडोळी), साहेबराव खोडक (गणेशपूर) या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या; परंतु हे सर्व शिक्षक नियुक्त करण्यात आलेल्या शाळेवर रुजू न होता, त्यांनी एकवेळा सेनगाव येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर जिल्हा परिषदेतून सेनगाव तालुक्याऐवजी अन्य सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळविली. परिणामी या शिक्षकांच्या जागा तशाच रिक्त आहेत. परिणामी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)सभापती, उपसभापतींची तक्रारया संदर्भात सेनगाव पं.स.च्या सभापती शेषीकलाबाई गोपाळराव पाटील, उपसभापती लक्ष्मीबाई गडदे, पं.स. सदस्या पुनम नागेश कोटकर यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गुरूवारी तक्रार केली. त्यामध्ये तालुक्यात नियुक्त करण्यात आलेले १५ शिक्षक मुळ गावी रुजू झाले नसून अन्य ठिकाणी रुजू झाले आहेत. त्यामुळे या भागातील शाळांना शिक्षकांअभावी कुलूप लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांची तात्काळ त्यांच्या मुळ पदस्थापनेवर नियुक्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
बदलीवर आलेले १५ शिक्षक गायब
By admin | Updated: July 18, 2014 01:51 IST