माजलगाव : तालुक्यातील शुक्लतीर्थ लिमगाव येथील गोदावरी पात्रातून विना परवाना बेसुमार वाळू उपास करण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आणले होते. या प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन परभणी तालुक्यातील पाथरी येथील वाळू ठेकेदाराविरुद्ध १४ कोटी रुपयांच्या वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सय्यद जाकेर पटेल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाळू ठेकेदाराचे नाव आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथील वाळूचा ठेका देण्यात आल्यानंतर ठेकेदारांनी पाथरी तालुक्यातील हद्दीतील वाळू उपसा तर केलाच पण विना परवाना माजलगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात होता. या बाबतचे वृत्त ३ मे रोजी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून वाळू माफियांकडून अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे समोर आणले होते. संबंधीत वृत्त प्रकाशित होताच उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे यांनी गंभीर दखल घेऊन याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला. शुक्ल तिर्थ लिमगाव येथून विनापरवाना १३ कोटी ९२ लाख रुपये किमतीची ४६ हजार ४०३ ब्रास वाळू उत्खनन करुन चोरी केल्याचा ठपका ठेवत महसूल बुडविल्या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मंडळ निरीक्षक सुधकार बुजू जंदेकर यांच्या फिर्यादीवरुन पाथ्री तालुक्यातील अंधापुरी येथील वाळूचे ठेकेदार सय्यद जाकेर पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि घोलप करीत आहेत. (वार्ताहर)
१४ कोटींच्या वाळूची चोरी
By admin | Updated: May 21, 2015 00:31 IST