तुळजापूर : तालुक्यातील आरळी (बु़) येथे इंग्रजकालीन राजवटीत १९०५ साली सुरू झालेल्या आठवडा बाजाराला शनिवारी तब्बल १११ वर्षे पूर्ण झाली़ या दिवसाला ग्रामस्थांनीही विविध उपक्रम राबवून ऐतिहासिक बनविले़तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु) या गावाने सामाजिक, सांस्कृतिक परंपरा कायम जोपासली आहे़ इंग्रज राजवटीच्या काळात १९०५ साली गावातील आठवडी बाजारास सुरुवात झाली. याला शनिवारी १११ वर्षे पूर्ण झाली़ मध्यंतरीच्या काळात दुष्काळ, अतिवृष्टी, प्लेगची साथ आल्यानंतर गाव बाहेर वसले़ त्यानंतर हा बाजारही गावाबाहेर स्थलांतरीत झाला. परंतु बाजारची परंपरा खंडित झाली नाही. त्याचे श्रेय गावातील त्या-त्यावेळच्या सुज्ञान गाव कारभाऱ्यांना जाते. त्याचे स्मरण करुन या अखंड आठवडी बाजाराला १११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी येणाऱ्या व्यापाऱ्यांना शाल, श्रीफळ व फेटा बांधून त्यांचा सन्मान केला. यावेळी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष किरण व्हरकट, उपसरपंच डॉ. व्यंकट पाटील, महोत्सव समिती अध्यक्ष सुनिल पारवे, चेअरमन अनिल जाधव व व्यापारी सुधाकर उकरंडे, ज्ञानेश्वर सरडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आरळीच्या आठवडी बाजाराला १११ वर्ष पूर्ण
By admin | Updated: March 12, 2017 23:12 IST