---
योगेश पायघन
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षकांची मराठी आणि उर्दु माध्यमाची मिळून १०७ पदे रिक्त आहेत. गेल्या २ वर्षांपासून ८१ शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. शिक्षक उपलब्ध असतांना प्रशालांतील विषयनिहाय शिक्षकांचा असमतोल चक्रावून टाकतो. जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले शिक्षक उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना अद्याप विषयांचे शिक्षक मिळू शकले नाहीत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीचा वर्ग माध्यमिकमधून उच्च प्राथमिकला जोडला गेला. या निर्णयाने ९३ माध्यमिक शिक्षक अतिरिक्त झाले. शिक्षक संघटनांच्या मागणीला प्रतिसाद देत जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडून पदनिर्धारण करून माध्यमिक शिक्षकांची ५० पदे नव्याने मंजूर करून आणली. मात्र, कोरोनाचा संसर्ग, लोकप्रतिनिधींचा दबाव, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पालकांच्या अनास्थेमुळे जिल्हा परिषदेच्या ८१ शिक्षकांचे समायोजन २ वर्षांपासून रेंगाळले आहे.
रांजणगांव येथे ९ पदे मान्य आहेत. त्यापैकी ४ शिक्षक कार्यरत असून, चौघेही विज्ञान शिक्षक आहेत. तसेच बोरगांव, नाचनवेल, वासडी, चिंचोली, मनूर, गंगापूर, उंडणगांव, शिवूर येथे विज्ञानाला शिक्षक नाही.
जिल्ह्यात १९ ठिकाणी इंग्रजी शिक्षक नाहीत. पण वाकला गावात ५ पैकी ३ शिक्षक इंग्रजी विषयाचे आहेत. समायोजनाद्वारे विहामांडवा, अंधारी, पानवडोद, तुर्काबाद, गणोरी, भिवधानोरा, शिवूर परसोडा, मनू, चापानेर, बनोटी, बोरगांव, बाजारसावंगी येथे इंग्रजी शिक्षक देण्याचे घोषित झाले होते. इंग्रजीचे पद १९ ठिकाणी रिक्त असतांना १४ अतिरिक्त शिक्षक उपलब्ध आहेत.
ढोरकीन, अजिंठा, शिवना, वैजापूर, वाकला, शिवूर, खंडाळा, बोरसर, मनूर, चापानेर, नाचनवेल, टाकळी, लाडसावंगी, भिवधानोरा अशा १६ ठिकाणी गणिताचे पद मान्य आहे. मात्र, गणिताचे शिक्षक नाहीत. दुसरीकडे गणिताचे १४ शिक्षक अतिरिक्त आहेत, तर कन्नडला एकाच शाळेत गणिताचे ३ शिक्षक कार्यरत आहेत.
सामाजिक शास्त्र आणि भाषा विषयासाठीही तशीच परिस्थिती दिसते. मनूर येथे सर्वच शिक्षक सामाजिक शास्त्रे विषयाचे, तर फुलंब्रीत ११ मंजूर पदांमध्ये ७ शिक्षक भाषा विषयाचे आहेत. जिल्ह्यात सामाजिक शास्त्राचे २४ शिक्षक अतिरिक्त असतांना १४ प्रशालांत या विषयाची पदे रिक्त आहेत. मराठी, हिंदीचे १६ शिक्षक अतिरिक्त असतांना २६ ठिकाणी जागा रिक्त आहेत.
---
उर्दुचीही तिच स्थिती
--
ढोरकीन, कसाबखेड्यात उर्दूचे वर्ग, विद्यार्थी आहेत. पण शिक्षक नाहीत. तर काही ठिकाणी २- २ अतिरिक्त शिक्षक आहेत. फुलंब्री, पैठण, चिंचोली, तुर्काबाद, गणोरी, लाडसावंगी, जातेगाव येथील उच्च माध्यमिक कला व विज्ञान शाळेला याच समायोजनातून शिक्षक कायम राहतील.
----
विषय -अतिरिक्त शिक्षक -रिक्त पदे
विज्ञान -८ -२६
गणीत -१४ -१६
इंग्रजी -१४ -१९
भाषा -१६ -२६
सामाज शास्त्र -२४ -१४
उर्दू माध्यम -५-६
एकूण -८२ -१०७
---
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना ज्या शाळांत दिले. त्या शाळा हजर करून घेत नाहीत. त्यांना त्यांच्या मर्जीनुसार नवीन नियुक्ती करून घ्यायची असते. त्यामुळे तेथून शिक्षक परत येतात. त्यामुळे २०-२१ शिक्षक, अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती राहिलेली आहे. इतर शिक्षकांची नेमणूक झालेली आहे.
-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद
---
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विषय शिक्षकांची पदे रिक्त असतांना जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले ८१ शिक्षक कार्यरत आहेत. त्यांची समुपदेशन प्रक्रिया रेंगाळलेली आहे. ती प्रक्रिया झाल्यास बहुतांश शाळांना, पर्यायी विद्यार्थ्यांना विषयाचे तज्ज्ञ शिक्षक मिळतील.
-अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती