बीड : अडीच महिने पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी २५७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता. मागील पाच-सहा दिवसांत पावसाचे जोरदार आगमन झाल्याने काही ठिकाणचे पाण्याचे उद्भव सुरू झाले आहेत़ मागील तीन दिवसांत १०७ टँकर बंद झाले असल्याचे निवासी जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सांगितले.आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, बीड, धारूर आदी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. अद्यापही टंचाई कायम आहे. परंतु ज्या त्या तालुक्याच्या तहसिलदारांनी व गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यांची पहाणी केली व ज्या गावातील पाण्याचे बंद पडलेले उद्भव सुरू झालेले आहेत त्या ठिकाणचे टँकर बंद केले आहेत. यामध्ये मागील तीन दिवसातील पाण्यामुळे मुरमाड जमीन असलेल्या भागात पाण्याची पातळी वाढलेली असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.याबाबत पहाणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मागील दोन दिवसापूर्वीच दिल्या होत्या. यावरून संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांनी उद्भव सुरू झालेल्या भागातील सुरू असलेले टँकर बंद केले आहेत. यामध्ये आष्टी, शिरूर कासार, पाटोदा, बीड या तालुक्यांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)जिल्हयात सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस सक्रीय झालेला आहे. यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे़ प्रशासनाने गुरूवारी ज्या गावातील पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद केलेले आहेत. तेथे पुन्हा टँकरची आवश्यकता भासल्यास तात्काळ टँकर सुरू करण्यात येईल असे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
तीन दिवसांत १०० टँकर बंद
By admin | Updated: August 29, 2014 01:29 IST