औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी राबविण्यात आलेल्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमात १० हजार मतदारांची वाढ झाली आहे. आता ६१ हजार ६२३ इतकी शिक्षकांची मतदार संख्या झाली आहे. शिक्षक भरती बंद असली तरी शिक्षक मतदार मात्र वाढले आहेत. औरंगाबाद व लातूरमध्ये सर्वाधिक नोंदणी झाली आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी पुढील वर्षी निवडणूक होणार असून, या निवडणुकीकरिता शिक्षकांची मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. १ आॅक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०१५ यादरम्यान शिक्षक मतदारांची नावनोंदणी, वगळणी, दुरुस्ती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत १० हजार ७९१ मतदारांनी नावनोंदणी केली असून, ७९६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. १ आॅक्टोबर २०१५ पर्यंत मराठवाड्यात ५१ हजार ६२८ शिक्षक मतदारांची मतदार यादी होती. त्यामध्ये १० हजार नवीन शिक्षक मतदारांची वाढ झाली असून, ६१ हजार ६२३ इतके मतदार झाले आहेत. १४ डिसेंबर रोजी शिक्षक मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मराठवाड्यात वाढले १० हजार शिक्षक मतदार
By admin | Updated: December 18, 2015 23:48 IST