उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल : मुबलक रोपांची उपलब्धतालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चार कोटींच्या उद्दिष्टापैकी महाराष्ट्राने वनमहोत्सवाच्या चौथ्या दिवशीच अडीच कोटीपर्यंत मजल मारली आहे. चंद्रपूर जिल्हा देखील २९ लाखांच्या शासकीय उद्दिष्टाच्या जवळ पोहचला आहे. मंगळवारी चौथ्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात सायंकाळपर्यंत २६ लाख २२ हजार वृक्षलागवड झाली होती. पोलीस दलाच्या वृक्षदिंडीने मंगळवारी आणखी उत्साह निर्माण केला. जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या नेतृत्वात सकाळी वृक्षदिंडीने शहर दुमदुमले. बुधवारी पाचव्या दिवशीच जिल्हा २९ लाखांच्या शासकीय उद्दिष्टाला पार करण्याची शक्यता आहे. या विक्रमी वृक्षलागवडीचे स्वागत करीत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी राज्याच्या अन्य जिल्ह्यापेक्षा अधिक वृक्षलागवड होईल, याची खात्री आहे. वनविभागाच्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले. जिल्हास्तरावर मंगळवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील विविध विभागाचा आढावा घेतला. मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी वनविभागामार्फत आतापर्यंत १८ लाख ५५ हजार ७८२ वृक्षलागवड झाल्याचे सांगितले. तर सर्व यंत्रणांमार्फत ७ लाख ६७ हजार वृक्षलागवड चार दिवसात झाल्याचे सांगितले. महानगरपालिकेने देखील आतापर्यंत २२ हजार ५६३ झाडे लावली आहेत. पुढील तीन दिवसात या मोहिमेत बहुसंख्य नागरिकांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने देखील आपल्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरु केली ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुरु असल्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेने आतापर्यंत २ लक्ष ५५ हजार १४९ वृक्षलागवड झाल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस दलाने केली उद्दिष्टपूर्तीपोलीस विभागाने मंगळवारी सकाळी शिस्तबध्द पध्दतीने वृक्षपालखी काढत जनतेमध्ये वृक्षलागवडीचे वातावरण निर्माण केले आहे. शहराच्या मुख्य भागातून पोलीस लाईन परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनात वृक्षलागवड करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाणे, सहा उपविभागीय कार्यालयात वृक्षलागवड सुरु आहे. मानवधर्म जोडण्यासाठी सर्वांनी वृक्षलागवड करावी, असे आवाहन एसपी ठाकर यांनी केले. पोलीस दलाला २७६५ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत २८५० वृक्षलागवड करण्यात आली असून उद्दिष्टाच्या अनेक पट रोपे लावली जातील, असा विश्वास ठाकर यांनी व्यक्त केला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विभागीय वाहतूक अधिकारी नागपूर शहर शरद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या नेतृत्वात वृक्षलागवड केली जात असून अनेक ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली आहे.
पोलीस विभागाच्या पालखीने वृक्षलागवडीचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 01:03 IST