वाढोणा-गिरगाव प्रभाग : अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षण नागभीड : १९९२ पासून सतत काँग्रेसच्या बाजूने कौल देणारा प्रभाग म्हणून नागभीड तालुक्यातील वाढोणा-गिरगाव या प्रभागाची ओळख आहे. यावेळी येथील आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी आले असल्याने सक्षम उमेदवारांची चणचण जाणवत असल्याचे दिसून येत आहे. २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी या प्रभागाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी आले आहे. वाढोणा गण अनुसूचित जमातीसाठी व गिरगाव गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. त्यामुळे उमेदवारी देताना प्रत्येकच राजकीय पक्षाचा कस लागणार आहे. तालुक्यातील तळोधी-गोविंदपूर आणि कान्पा मौशी हे प्रभागसुद्धा अनुसूचित जमातीसाठीच आरक्षित झाले. पण या ठिकाणी उमेदवारीसाठी उड्या पडत आहेत. मात्र वाढोणा-गिरगाव गटा महिलेसाठी आरक्षित असल्याने कोणत्याही पक्षात स्वत:ची ओळख असलेल्या एकाही महिलेचे नाव अद्यापही समोर आलेले दिसत नाही. सावरगांवच्या नयना गेडाम यांचे नाव काँग्रेसकडून तर पारडी-बाळापूरच्या विद्यमान जि.प. सदस्य लीना पेंदाम यांचे नाव भाजप वर्तुळात घेतले जात आहे. वाढोणा आणि गिरगावासाठी दोन्ही पक्षात उमेदवारांची बरीच भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. वाढोणा हा गण अनुसूचित जमातीसाठी आहे. येथून काँग्रेसकडून शेखर सडमाके, मिथून मसराम यांची तर प्रकाश कुंभरे, लाला उईके, सीताराम मडावी यांची नावे भाजपकडून घेतल्या जात आहेत. गिरगाव गण अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काँग्रेसकडून येथे चेतन खोब्रागडे, लिनेश बन्सोड, योगिराज खोब्रागडे यांची नावेसुद्धा चर्चेत आहेत. मात्र तालुक्याचे नेते आणि तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे यांनी या गणातून निवडणूक लढवावी, असा या गणातील प्रमुख नेत्याचा सूर आहे. मात्र खापर्डे यांनी अद्याप आपले ‘पत्ते ओपन’ केलेले नाहीत. भाजपकडून या ठिकाणी परीश शेंडे, पंचम खोब्रागडे आणि नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले केदार मेश्राम यांची नावे घेतली जात आहेत. (तालुका प्रतिनिधी)
जि.प. सर्कलमध्ये सामसूम तर पं.स. मध्ये धामधूम
By admin | Updated: December 23, 2016 00:48 IST