बा पावसा, आता तरी बरस : शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षागोवरी : पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेवर तब्बल २० दिवसांचा कालवधी उलटून गेला. मात्र जिल्ह्यात पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. वरुणराजा बरसेल या प्रतीक्षेत सर्वत्र आराधना करण्यात येत आहे. गोवरी येथील ८ युवकांनी वरुणराजाला साकडे घालण्यासाठी चक्क मुंडन केले. परंतु पाऊस येण्याची चिन्ह दिसत नसल्याचे शेतकरी हताश झाले आहेत.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचे शेतकऱ्यांना दगा दिला आहे. उसनवारी व कर्ज काढून घेतलेले महागडे बियाणे अपुऱ्या पावसाने जमिनीतच करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथील बंडू जुनघरी, चंदन ताजणे, विठ्ठल जुनघरी, मारोती वाढई, समाधान पिंपळशेंडे, कवडू खवसे, संतोष ताजणे, संजय म्हशाखेत्री या आठ युवकांनी पाऊस येण्यासाठी मुंडन केले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी राजा अजुनही होरपळतो आहे. निसर्गाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. निसर्गाशिवाय शेती ही संकल्पनाच करणे अवघड आहे. मात्र निसर्ग आता लहरीपणामुळे वागायला लागल्याने शेती बेभवरश्याची झाली आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट असून या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहायला कोणीही तयार नाही. पावसाला साकडे घालण्यासाठी सर्वच स्तरातून पूजा, पाठ करण्यात येत आहे. मात्र वरुणराजा का रुसला असा प्रश्न सर्वांनाच अनुत्तरीत करणारा आहे. ग्रामीण भागात पाऊस येण्यासाठी सर्व कामे बाजूला ठेऊन आराधना करण्यात येत आहे. आकाशात काळे ढग गर्दी करतात. मात्र पाऊस सर्वांनाच हुलकावणी देत निघून जात आहे.आज, उद्या पाऊस येईल, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहते. दिवसरात्र काबाडकष्ट करुनही शेवटी हाती काहिच लागत नाही. हे आजवरचे एककटू सत्य आजही कायम आहे. पाऊस येण्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका क्षणाक्षणाला चुकत असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. वरूण राजा आता तरी कृपा कर अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून सुरू आहे. (वार्ताहर)
गोवरी येथे पावसासाठी युवकांचे मुंडण
By admin | Updated: June 24, 2016 01:33 IST