मागील काही वर्षांपासून पोलीस भरती रखडली आहे. या पार्श्वभूमीवर यंदा सर्वात मोठी म्हणजेच १२ हजार पदांची पोलीस भरती करण्याची घोषणा गृहविभागाने केली. त्यात पहिल्या टप्प्यातील भरतीला सुरुवात झाली होती. त्यामुळे मागील काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सर्व शारीरिक क्षमता चाचणीसाठी मैदानावर घाम गाळत होते. त्यासोबतच ग्रंथालयात जावून अभ्यास सुरु केला होता. मात्र शासनाने पोलीस भरतीचा जीआर रद्द केला. या निर्णयामुळे युवकांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच ज्या उमेदवारांची वयाची मर्यादा समाप्त होत आहे. त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
बॉक्स
जिल्ह्यात एक हजार लोकांमागे एक पोलीस
जिल्ह्यात पोलीस दलात लोकसंख्येच्या तुलनेत अल्प मनुष्यबळ आहे. जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या जवळपास २५ लाखांच्या घरात आहे. मात्र पोलीस विभागात जवळपास २५०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे एक हजार लोकसंख्येमागे एक पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. कमी मनुष्यबळामुळे पोलिसांचा ताण वाढत आहे.
कोट
मागील दोन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. भरतीसंदर्भात घोषणा झाल्याने आनंद झाला होता. मात्र आता भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याने आशेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे नवा भरतीचा जीआर केव्हा निघेल, याची प्रतीक्षा लागून आहे. शासनाने लवकर भरती प्रक्रिया राबवावी.
- प्रफुल्ल गोंगले
चंद्रपूर
कोट
बालपणापासून खाकी वर्दीचे आकर्षण आहे. त्यामुळे पोलीस होण्याचे स्वप्न आहे. पोलीस भरतीचा जीआर निघताच सकाळ संध्याकाळ ग्राऊंडवर जावून भरतीची तयारी सुरु केली. ग्रंथालय लावून अभ्यासही सुरु केला. मात्र शासनाने भरती संदर्भातील जीआर रद्द केल्याने पुन्हा भरतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- बादल खोब्रागडे
मूल
कोट
पोलीस होण्याचे स्वप्न या भरतीत पूर्णत्वास येईल अशी आशा होती. त्यामुळे पंखांना बळ देण्यासाठी प्रयत्नही सुरु केले होते. भरती संदर्भातील पुस्तक संच खरेदी करुन तसेच जयभीम वाचनालयातील पुस्तकांचा आधार घेत अभ्यासही सुरु केला होता. मात्र भरती रद्द झाल्याने अपेक्षा भंग झाल्या आहेत.
- प्रफुल्ल बोरकर, सावली