बल्लारपूर: तालुक्यातील विसापूर ते नांदगाव (पोडे) या दोन किलोमिटर मार्गाचे नुतणीकरण करण्याचे काम कासवगतीने सुरू आहे. या कामासाठी रस्त्यावर गिट्टीचे ढिगारे टाकण्यात आले. या ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून त्यामुळे अपघातही वाढले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. विसापूर-नांदगाव (पोडे) या मार्गाच्या नुतणीकरणासंदर्भात प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली. कामाच्या निविदा निघून कंत्राटदाराला कामही देण्यात आले. परंतु संबंधित कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाची अवहेलना सुरू केली आहे. तिन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला गिट्टीचे ढिगारे टाकण्यात आले. आता काम वेगाने होईल, असे नागरिकांना वाटले. मात्र नागरिकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेले. एक दिवस काम सुरू तर चार दिवस काम बंद असा प्रकार सुरू आहे. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून त्यामुळे नागरिकांना अकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता लेहगावकर यांना विचारणा केली असता, काम मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले होते. कामही सुरू आहे, असे त्यांनी सांंगितले. मात्र सदर कंत्राटदार अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याने अधिकाऱ्यांनीही या कंत्राटदारापुढे हात टेकले आहेत. याचा त्रास मात्र नागरिकांना भोगावा लागत आहे. नांदगाव (पोडे) येथील वेकोलिच्या कोळसा खाणीत कार्यरत कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी केवळ हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे रात्री-बेरात्री या कर्मचाऱ्यांना याच मार्गाने ये-जा करावी लागते. यासंदर्भात वेकोलिच्या कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनाही आपल्या व्यथा सांगितल्या. मात्र लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले. (शहर प्रतिनिधी)
विसापूर-नांदगाव मार्गाचे काम कासवगतीने
By admin | Updated: March 30, 2015 00:51 IST