कारखान्याची सुरक्षा धोक्यात : व्यवस्थापनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी भद्रावती : आयुधनिर्माणी कारखाना येथे ठेकेदारीत काम करणाऱ्या कामगारांना पोलीस चौकशी अहवालाची आवश्यकता असते. मात्र काही ठेकेदार हा अहवाल नसलेल्या कामगारांना कामावर घेत असल्याचा आरोप कुमार मुर्गेशन रंगास्वामी यांनी आयुध निर्माणी महाप्रबंधकाकडे केला आहे. तसे त्यांनी निवेदन दिले आहे. आयुधनिर्माणी कारखान्यात वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धात वापरण्यात येणारे आयुध तयार केले जाते. त्यामुळे हा कारखाना अतिशय संदेवनशिल आहे. लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कारवाया नेहमीच होत असतात. अशावेळी या ठिकाणी ठेकेदार पद्धतीत काम करणाऱ्या कामगारांना पोलीस तपास अहवाल आवश्यक असते. परंतु या ठिकाणी कार्यरत काही ठेकेदार व्यवस्थापनाच्या डोळ्यात धूळ झोकून पोलीस चौकशी अहवाल नसलेल्या कामगारांना कामावर घेत आहेत. यात झोन नंबर १ एस.एम. एन्टरप्रायजेस, झोन नंबर २ मोहम्मद सिंकदर शेख, झोन नंबर ३ एम.के. एन्टरप्रायजेस या तीन ठेकेदाराचा समावेश आहे, असे तक्रारकर्त्यानी म्हटले आहे. तक्रारकर्ते कुमार रंगास्वामी हे गेल्या सात वर्षांपासून गटर लाईनचे काम करीत आहे. त्यांचा पोलीस चौकशी अहवाल आहे. तरी त्यांना ठेकेदाराने कामावरुन काढून टाकले. तर याच ठेकेदारांकडे शाम पांडियन कोरवन, राजू पांडियन कोरवन, शिवाजी आंडी हे पोलीस चौकशी अहवाल नसलेले कामगार कार्यरत आहेत, असे म्हटले आहे. आयुध निर्माणी महाप्रबंधकांनी याकडे तत्काळ लक्ष देऊन कारखान्याची सुरक्षा बाधीत राहावी असे ठोस पावले उचलावी, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)
आयुध निर्माणीत पोलीस चौकशी अहवाल नसलेले कामगार
By admin | Updated: December 29, 2016 02:07 IST