चंद्रपूर : इमारत मालाची वाहतूक करण्यासाठी निविदा न काढताच वन विभागाच्या बल्लारपूर डिव्हिजनमध्ये मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्यात येत असून यात, कंत्राटदारासह वनसंरक्षक खडसे हे सुद्धा दोषी असल्याचा आरोप वाहतूकदार राममिलन यादव यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.राममिलन यादव म्हणाले, वनविभाग आणि एफडीसीएम यांच्यातील इमारत मालाच्या वाहतूक दरात १९० रूपयांची प्रति मिटर तफावत दिसते. यातून गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीमधून वनविभागाला झळ सोसावी लागत आहे. २०१२-१३ मध्ये कक्ष क्रमांक ५८ आणि ७९ वनपरिक्षेत्र आलापल्ली येथील इमारती मालाच्या वाहतुकीतही घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. निविदा काढल्यावर हे काम एस. व्यकंटेश्वर राव यांना देण्यात आले. मात्र त्यांनी संपूर्ण आलापल्ली डिव्हिजनचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला. वनसंरक्षक खडसे यांच्या माध्यमातून कंत्राटदाराला मंजूर दरापेक्षा १० टक्के दरवाढ करून वाहतूक केली गेली. शहरातील अन्य कंत्राटदारही याच व्यवसायात असताना केवळ त्यांनाच निविदांशिवाय काम देण्यात येते. यासाठी खडसे जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला. एस. व्यकटेश्वर राव यांच्याकडून सुरू असलेल्या वाहतुकीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणी वरीष्ठांकडे तक्रार केली असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला कंत्राटदार सेवा सिंग, जसवंत सिंग आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
निविदा न काढताच कंत्राटदाराला काम
By admin | Updated: February 28, 2015 01:21 IST