गडचांदूर : लोकमत सखी मंच गडचांदूरच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून नुकतीच स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा व पूजा थाली सजावट स्पर्धाचे आयोजन उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उपप्राचार्य सुभाष पाथ्रीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. चे शिक्षक रासेकर, लोकमत सखी मंच गडचांदूरच्या अध्यक्षकल्पना निमजे, सचिव निर्मला ठावरी, उपाध्यक्षा माया धोटे, प्रभा डोईफोडे होत्या. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्वागत गीताने व पुष्पहाराने अतिथीचे स्वागत करण्यात आले. उपप्राचार्य सुभाष पाथ्रीकर व रासेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सखी मंचतर्फे सत्कार करण्यात आला.संयोजिका कल्पना निमजे यांनी प्रास्ताविकातून सखी मंचची वाटचाल व आयोजनाबद्दल माहिती दिली. वक्तृत्व स्पर्धेत १२ महिलांनी सहभाग घेऊन परखड मते मांडली. स्त्री शिक्षणामुळेच सामाजिक सुधारणांची चळवळ फोफावल्याचे मत बहुतांश महिलांनी व्यक्त केले. प्रथम क्रमांक आवंडे यांनी पटकाविला, द्वितीय माधुरी पोतनुरवार, तृतीय रेखा शेंडेकर यांनी पटकाविला. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण सुभाष पाथ्रीकर व रासेकर यांनी केले. पूजा थाली सजावट स्पर्धेतसुद्धा महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रथम बक्षीस सुमना वनकर यांनी पटकाविले. द्वितीय माधुरी मसे , तृतीय चेतना ठाणेकर यांनी पटकाविले. या स्पर्धेचे परीक्षण अपर्णा उपलेंचवार, अपर्णा उपगन्लावार, बाळापुरे यांनी केले. विजेत्या सर्व स्पर्धकांना अतिथीच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. सखी मंचने रचनात्मक कार्य करावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून यावेळी केले. कार्यक्रमाला सखी मंचच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संचालन नंदा वांढरे यांनी केले. आभार कोरे यांनी मानले. (वार्ताहर)
स्त्री शिक्षणामुळेच सामाजिक सुधारणांची चळवळ फोफावली
By admin | Updated: September 29, 2014 23:04 IST