चित्रा वाघ यांचे प्रतिपादन : राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मेळावाचंद्रपूर : राष्ट्रवादीने महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले असून आरोग्य सुविधांसोबत युवती आणि महिलांना रोजगाराच्या संधी मिळण्याबाबत जागृती करण्यासाठी धोरण आखलेले आहे. महिलांनीही प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रगती पाटील, प्रदेश सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, शहर जिल्हाध्यक्ष शशी देशकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, ज्येष्ठ नेत्या शोभा पोटदुखे, माजी जिल्हाध्यक्ष हेमलता पाजनकर, विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे, डी.के. आरीकर यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, महिलांवरील वाढत्या अत्याचाराचे आकडे बघता महिलांनी एकजुटीने अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावे व विद्यमान सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि पोलीस विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे महिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारला निवेदने देऊन न्याय मिळणार नसेल तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर उतरुन असंवेदनशील सरकारच्या विरोधात संघर्षपूर्ण आंदोलन करणार असल्याची माहिती वाघ यांनी यावेळी दिली.यावेळी राजेंद्र वैद्य तसेच इतरही पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमादरम्यान जिल्हाभरातील जवळपास १०० महिलांनी रॉकामध्ये प्रवेश घेतला. संचालन शहर जिल्हा अध्यक्ष ज्योती रंगारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियदर्शन इंगळे, अमित उमरे, संजय वैद्य, नीलेश ताजने, देव कन्नाके, माधुरी येरणे, महानंदा वाळके, अश्विनी गुरमे, विजयालक्ष्मी डोहे, शांता मोतेवाड, वनिता कुंटावार, संगीता आगलावे, सुनीता नरडे, संचिता मेश्राम, जीवनकला आलाम यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घ्यावी
By admin | Updated: September 17, 2015 00:55 IST