प्रेमिलाबाई आठ दिवसांपासून तापाने आजारी होत्या. राजुरा येथील खासगी दवाखान्यात उपचारही केला होता. परंतु, गुरुवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्या एकट्याच राहत असल्याने रात्री दवाखान्यात नेण्यासाठी कुणीच नव्हते. त्यामुळे पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सकाळी प्रेमिलाबाई उशिरापर्यंत उठली नसल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पाहणी केली असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच प्रेमिलाबाईला पाहण्यासाठी तिच्या घराकडे नागरिकांनी धाव घेतली. कोरोना संसर्ग असल्याने नियमांचे पालन करून गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोवरी येथे मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असून, बहुतांश नागरिक तापाने फणफणत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने गोवरी येथे आरोग्य शिबिर घेऊन गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गोवरी येथे तापाच्या साथीने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST