जिवती : शेजाऱ्याशी भांडण झाले. दोघांनीही पोलिसात तक्रार केली. मात्र समझोत्याने हा वाद मिटविण्यासाठी दोन्ही कुटुंबांना जिवती पोलीस ठाण्यात बोलावले. या दरम्यान एका कुटुंबातील महिलेने ठाणेदारासमोरच विष प्राशन केले. तिला तत्काळ चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
शेणगाव येथील रामा गोटमवाड आणि शेजारी एका कुटुंबात ७ जानेवारीला भांडण झाले. रामा गोटमवाड यांनी जिवती पोलीस स्टेशन गाठून विरोधातील कुटुंबाची तक्रार केली. शुक्रवारी दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली. दरम्यान जिवतीचे ठाणेदार संतोष अंबिके यांनी दोघांमध्ये समझोता करून घेण्यासाठी बोलावलेे. यादरम्यान ठाणेदारांनी सात हजार रुपये गोटमवाड यांच्याकडून घेतले, असा रामा गोटमवाड यांनी केला आहे. पैसे घेऊनही त्यांनी आम्हाला दिवसभर ठाण्यात बसवून ठेवले आणि आता तुमच्यावर दारूची केस लावतो, अशी धमकी दिल्याचेही रामा गोटमवाड यांनी सांगितले. याला कंटाळून परवीन रामा गोटमवाड या महिलेने ठाण्यातच विष प्राशन केले. विष पिल्यानंतर ठाणेदार यांनी महिलेला मदत करण्याऐवजी अशा केसेस मी खूप पाहिल्या असे म्हणत त्यांच्या समोरच अरेरावीची भाषा वापरण्यास सुरू केली, असा आरोप रामा गोटमवाड यांनी केला आहे. अखेर विरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या कुटुंबाने महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली. पण ठाण्यातील एकही कर्मचारी सोबत आले नसल्याची खंतही गोटमवाड यांनी व्यक्त केली. शेवटी मी खासगी वाहन करून पत्नीला गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात नेले, असेही गोटमवाड यांनी सांगितले.
कोट
मी काही महिन्यांपूर्वी दारू विकत होतो. त्यावेळी ठाणेदारांनी मला पैशाची मागणी केली होती. परंतु त्यांचा आकडा जास्त असल्यामुळे मी तो व्यवसाय बंद केला. तोच राग मनात ठेऊन ठाणेदारांनी मला व माझ्या पत्नीला दिवसभर ठाण्यात ठेवले व माझ्या पत्नीला विष प्राशन करण्यासाठी प्रवृत्त केले.
-रामा गोटमवाड, शेणगाव
कोट
शेणगाव येथील दोन कुटुंबातील भांडण असून गोटमवाड यांची मी तक्रार नोंदवून घेतली आहे. त्यांना समझोता करण्यास पैसे घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही. विष प्राशन केल्यानंतर आमचा कर्मचारी दवाखान्यात सोबत होता.
- संतोष अंबिके, सहायक
पोलीस निरीक्षक, जिवती