एक गुंड पाण्यासाठी अर्धातास परिश्रम: मैलभर अंतरावरून आणावे लागते पाणीनितीन मुसळे सास्तीराजुरा तालुक्यातील वेकोलि परिसरातील चार्ली- निर्ली गावात पाण्यासाठी हाहाकार माजला असून गावातील संपूर्ण विहिरी व बोरवेल आटल्या आहेत. नळयोजना ठप्प आहे. महिलांना मैलभर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे, तर एका बोरवेलवर गुंडभर पाण्यासाठी अर्धा तास बोरवेलवर परिश्रम करावे लागतात. परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.राजुरा तालुक्यातील वेकोलि भागातील गावांत उन्हाळा सुरु होताच पाण्याची पातळी खोल जाते. नदी - नाले व तलाव तर सोडाच गावातील विहीरी बोरवेलसुद्धा आटत असून नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागते. दरवर्षीच उद्भवणाऱ्या या समस्येकडे मात्र प्रशासन कमालिचे दुर्लक्ष करीत असून येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या भागातील चार्ली - निर्ली या गावांना उन्हाळा सुरु होताच, पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. यावर्षी येथील नाले व तलाव फेब्रुवारीतच कोरडे पडले, तर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरी आटणे सुरु झाले व आता एप्रिलमध्ये २०० ते २५० फूट खोल असलेल्या बोरवेलसुद्धा आटल्या आहेत व नळयोजनाही ठप्प आहेत. गावातील तीन सरकारी विहीरी, चार बोरवेल आटल्या असून अनेकांच्या घरगुती बोरवेलही आटल्या आहेत. गावातील नळ योजनासुद्धा ठप्प पडली आहे. नळयोजनेच्या स्त्रोतासाठी असलेल्या विहीरीही आटली असल्याने या नळयोजनेचे पाणी महिन्यातून एखाद्यावेळीच नागरिकांना मिळते. त्यामुळे अन्य दिवशी महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मैलभर अंतरावरील शेतातील बोरवेलवरुन पाणी आणल्या जात असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे त्वरीत लक्ष देऊन पाण्याची सोय करण्याची मागणी केली जात आहे.
वेकोलि परिसरातील गावांत पाण्यासाठी हाहाकार
By admin | Updated: April 20, 2016 01:25 IST