चंद्रपूर : उत्खननासाठी लागणाऱ्या लीजचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वनपाल, लिपिक आणि चौकीदारास अटक करण्यात आली. ही कारवाई चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सिंदेवाही तालुक्यातील तळोधी (बा.) येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास केली. विठोबा वैरागडे (वनपाल), यशवंत गौरशेट्टीवार (लिपीक) आणि जितेंद्र डोर्लीकर (चौकीदार) अशी लाचखोरांची नावे आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील कंत्राटदाराने नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील खसरा क्रमांक ३८३ आराजी ४.९६ हेक्टर महसूल जागेवर बोल्डर, मुरुम आणि गिट्टी उत्खननासाठी लागणाऱ्या लिजसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी पत्र पाठविले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी नागभीडचे तहसीलदार आणि वनपरिक्षेत्राधिकारी तळोधी यांना पत्र पाठवून निर्णय घेण्यास कळविले. लिजसाठी ग्रामपंचायतचा ठराव व वनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदाराने ६ नोव्हेंबर २०१५ रोजी तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयातील लिपीक गौरशेट्टीवारची भेट घेतली. यावेळी गौरशेट्टीवार यांनी या कामासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. तसेच हे प्रकरण वनपाल विठोबा उष्टुजी वैरागडे यांच्याकडे असून लाचेची रक्कम मिळाल्यानंतरच काम केले जाईल असे सांगितले.मात्र, रक्कम देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाकडे केली. मंगळवारी पाच हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी परिसरात सापळा रचण्यात आला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वनपाल वैरागडे यांना पाच हजार रुपयाची लाच घेताना एसबीच्या पथकाने अटक केली. वैरागडे याने स्वीकारलेल्या लाचेतून लिपीक यशवंत गौरशेट्टीवार आणि चौकीदार जितेंद्र डोर्लीकर यांचा वाटा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. या कारवाईने वनविभागात खळबळ उडाली असून आणखी अधिकारी, कर्मचारी निशाण्यावर आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
लाच घेताना वनपाल लिपीक, चौकीदाराला अटक
By admin | Updated: November 20, 2015 00:44 IST