भिसी : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व २० हजार लोकसंख्येच्या भिसी येथील आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. येथे कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत एकाच डॉक्टरला आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळावा लागत आहे. कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांची मोठी गैरसोय होत असून याकडे मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. चिमूर तालुक्यात लोकसंख्येच्या बाबतीत भिसी हे दुसऱ्या क्रमांकाचे गाव आहे. येथे विविध शासकीय कार्यालय, महाविद्यालय, संस्था व निमशासकीय कार्यालये आहेत. मात्र, आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भिसी, पुयारदंड, आंबेनेरी, येरखडा, जामगाव, सावर्ला, महागाव या सात आरोग्य उपकेंद्राचा समावेश आहे. मात्र, या उपकेंद्रातही कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. भिसी आरोग्य केंद्रात एक महिन्यापूर्वी डॉ. सिध्दार्थ गेडाम हे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. ते रुजू होताच रुग्णांविषयी आपुलकी दाखवत सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आजच्या घडीला ओपीडीत चारशेपेक्षा जास्त रुग्णांची नोंद आहे. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असून रुग्णांची गैरसोय लक्षात घेता, येथे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
एका डॉक्टरवर आरोग्य केंद्राचा भार
By admin | Updated: September 27, 2014 23:13 IST