पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील अवघड क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या देवाडा बूज येथील पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिल न भरल्याने महावितरण कंपनीने ही कारवाई केली आहे. यामुळे गावात नळयोजनेचा पाणीपुरवठा ठप्प होऊन पाणी टंचाई जाणवत आहे.
गावातील नळयोजनेचा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी घाटावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे. येथील पाणी पुरवठा योजनेचे विद्युत बिल ४० हजार रुपये असल्याचे कळते. गावात पाणी टंचाईचे सावट पसरले असताना येथील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. तेव्हा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.