प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष : पाणी टंचाईने प्रकल्पग्रस्त त्रस्तसास्ती : दरवर्षीप्रमाणे राजुरा तालुक्यातील वेकोलि परिसरातील साखरी येथे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. येथील नळयोजना विविध कारणामुळे मागील अनेक वर्षांपासून ठप्प पडली आहे. गावातील सार्वजनिक विहिरी व बोअरवेलसुद्धा आटल्या आहेत. घरगुती बोअरवेलला पाणी नसल्यामुळे येथील नागरिक गावाशेजारील शेतातील विहिरी व बोअरवेलवरुन पाणी आणत होते. परंतु येथील शेतजमिनी वेकोलिने पोवनी दोन कोळसा खाणीकरिता अधिग्रहीत केल्यामुळे साखरीवासीयांचे पाण्याचे स्रोत वेकोलिच्या घश्यात गेले आहे.दरवर्षी वेकोलिमुळे परिसरातील गावात पाणी टंचाईची झळ सुरू होते. परंतु प्रशासन मात्र याकडे कमालीचे दुर्लक्ष करते. गावात नळयोजना असूनही पाण्यासाठी वणवण करावी लागते. साखरी येथे नळयोजना असून तीही ठप्प पडली आहे. पाण्यासाठी सार्वजनिक विहिरी, बोअरवेल आहेत. परंतु त्याही आटल्या आहेत. गावकऱ्यांनी घरगुती बोअरवेलसुद्धा खोदल्या. परंतु त्यांचीही पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली असून एखाद्या वेळी एक हंडाभर पाणी त्यातून निघते. अशा परिस्थितीत येथील नागरिक गावाशेजारील शेतात असलेल्या विहिरी व बोअरवेलवरुन पाणी आणत होते. परंतु या शेतजमिनी वेकोलिने अधिग्रहीत केल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील बोअरवेलवर असलेल्या मोटारी काढून घेतल्यामुळे साखरीवासीयांना या बोअरवेलवरुनसुद्धा पाणी मिळणे बंद झाले आहे.पाणी टंचाई जाणवत असतानासुद्धा प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करते. येथील नळयोजनेचे स्रोत आटल्यामुळे नळयोजना ठप्प पडली आहे. गावातील पाण्याची टाकी पांढरा हत्ती ठरत आहे. नळयोजनेसाठी दुसरे स्त्रोत करण्यात आले. त्यात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पाईपलाईनचे काम अर्धवट राहिल्यामुळे पाणी मिळणे शक्य झाले नाही. पाईप लाईनच्या कामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने आठकाठी घातल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नळ योजना सुरू केली असती तर पाणी टंचाईची समस्याच उद्भवली नसती. येथील पाणीटंचाई पाहता त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)पाणीटंचाईमुळे आम्हा महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावातील नळयोजना, हातपंप, विहिरीत पाणी नसल्याने शेतातील विहिरीवर धुणी भांडी करावी लागत आहे. शेती वेकोलित गेल्यामुळे शेतातील बोअरवेल बंद पडल्या असल्या तरी गावाशेजारी पाणी असलेल्या शेतातील विहिरी वेकोलिने गावकऱ्यांसाठी खुल्या ठेवाव्यात.- छाया सुनील इटनकर, साखरीपाणी टंचाई जाणवत असून नव्या नळयोजनेच्या पाईप लाईनचे काम सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने वरिष्ठांकडे नळयोजनेचे काम त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. लवकरच नळयोजना सुरू करण्यात येईल.- डी. बी. डेहणकर, ग्रामसेवक साखरी
वेकोलिच्या भूमी अधिग्रहणामुळे पाण्याचे स्रोत गायब
By admin | Updated: April 24, 2016 01:04 IST