वरोरा : शहरात नाल्या उघड्या असून त्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने पाण्याचे डबके साचून राहत आहे. परिणामी मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या थंडीचे दिवस असतानाही डासांचा प्रभाव दिसत आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया, विषमज्वर साथीचे रोग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वॉर्डात सिमेंट नाल्या व्यवस्थित साफ नसल्याने नालीमधून पाणी व्यवस्थित वाहत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
सायबर गुन्ह्यावर आळा घालण्याची मागणी
ब्रह्मपुरी: दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. नवीन नंबरवरुन फोन करुन बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुबाडण्यात घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यावर आळा घालण्याची मागणी केली आहे.
श्रावणबाळ लाभार्थ्यांना मानधन द्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी वेतनापासून वंचित असून त्यांना तातडीने मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचे मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहे.