बल्लारपूर : चार महिन्यांनंतर बल्लारपूर नगर परिषदेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्ष व तरुण वर्ग तयारीलाही लागले आहेत. परंतु नगरपालिका निवडणुकीचे वेध लागलेल्या युवकांना व ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा आणि वॉर्ड की प्रभागाच्या सस्पेन्सने घेरले आहे.
कोरोना संकटामुळे काही निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. परंतु ४ महिन्यांनंतर होणाऱ्या बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे वेध सर्वांना लागले आहेत. मागील निवडणूक डिसेंबर २०१६ ला झाली होती. निवडणुकीसाठी ४ महिन्यांचा वेळ असला तरी राज्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक वॉर्ड की प्रभागानुसार या मुद्द्याकडे विशेष लक्ष दिलेले दिसत नाही. गेल्या निवडणुका प्रभाग पद्धतीने झाल्या होत्या. राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यानंतर हिवाळी अधिवेशनात वॉर्ड पद्धतीने निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून इच्छुकांना वॉर्डाच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. प्रभाग पद्धतीत उमेदवाराची दमछाक होते, तर वॉर्ड असल्यास तेवढे बळ लागत नाही. चार महिन्यांत निवडणूक अपेक्षित असल्यामुळे वॉर्ड व प्रभागाच्या सस्पेन्सने इच्छुकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
बल्लारपूर नगर परिषदेमध्ये ३२ वॉर्डांचे ८ प्रभाग आहेत. ४ वॉर्डांचा एक प्रभाग यामुळे अपक्ष उमेदवाराला तारेवरची कसरत करावी लागली. काँग्रेस, भाजपने बाजी मारली. या वेळी वॉर्डनिहाय निवडणूक झाली, तर चित्र वेगळे दिसण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांपासून नव्या तरुण इच्छुकांनी वॉर्डावॉर्डांत जनसंपर्क वाढविला आहे. आतापासूनच काहींनी आपला वॉर्डही निवडून ठेवला आहे. प्रतीक्षा आहे ती घोषणेची. परंतु कोरोनाचा प्रभाव कमीजास्त होत असल्यामुळे निवडणूक कधी होणार हे निश्चित नाही.
आघाड्यांचाही सस्पेन्स
आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये कोणकोणत्या राजकीय पक्षांची आघाडी होणार, हा सस्पेन्स कायम आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित, एमआयएम, रिपाइं अशा विविध राजकीय पक्षांकडे अनेक इच्छुक संपर्क करीत आहेत. अनेकांनी आपल्या पक्षाने जर नकार दिलाच, तर पडद्याआड इतर पर्यायाची चाचपणीही सुरू केली आहे.