ग्रामीण भागात आजही दळणवळणाच्या सोई उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेता रुग्णांना वेळेवर उपचार व्हावे, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय आरोय अभियानांतर्गत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला सुरुवात केली. चंद्रपूर जिल्ह्यात विभागीय व्यवस्थापक डॉ. घाटे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व्यवस्थापक डॉ. चेतन कोरडे यांच्या नेतृत्वात सर्व सोईसुविधांयुक्त २३ रुग्णवाहिका धावतात. कोरोनापूर्वी या रुग्णवाहिकेसाठी सुमारे १०० ते दीडशेच्या जवळपास कॉल येत होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. १०८ च्या रुग्णवाहिकेत सर्व सोईसुविधा असल्याने तसेच तज्ज्ञ डॉक्टर राहत असल्याने वेळप्रसंगी रुग्णवाहिकेतील डॉक्टर रुग्णावर प्राथमिक उपचार करत असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता चार ते पाच पटीने म्हणजेच जवळपास ४०० कॉल्स येतात. त्यामुळे रुग्णांना सेवा देण्यात मोठी धावपळ करावी लागत आहे. बऱ्याचदा रुग्णांना वेटिंगवर राहण्याची वेळही येत आहे.
बॉक्स
कॉल केल्यानंतर ३० मिनिटांत रुग्णवाहिका हजर
१०८ या रुग्णवाहिकेला कॉल केल्यानंतर शहरी भागात २० मिनिटांत, तर ग्रामीण भागात ३० मिनिटांत हजर होते. त्यामुळे ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरत आहेत. आता कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याने बऱ्याचदा रुग्णांना वेटिंगवर राहावे लागते.
या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन, व्हेटिंलेटर यासोबत सर्वच सोईसुविधा तसेच तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहत असल्याने रुग्णांवर रुग्णवाहिकेतसुद्धा उपचार करता येतात. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेपेक्षाही या रुग्णवाहिकेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
बॉक्स
ग्रामीणमधून १०८ रुग्णवाहिकेला मागणी
१०८ रुग्णवाहिका रुग्णाला त्याच्या घरून किंवा शासकीय रुग्णालयातून जिल्ह्याच्या किंवा इतर ठिकाणी मोफत नेत असते. त्यामुळे ग्रामीण भागातून या रुग्णवाहिकेसाठी सुमारे ३५ टक्के कॉल्स येतात. परिसरातील ज्या ठिकाणची रुग्णवाहिका खाली असेल ती रुग्णवाहिका त्वरित पाठवली जाते. त्यामुळे ही रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरत आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण १०८ रुग्णवाहिका २३
बॉक्स
दररोज शहरातून येणारे कॉल्स ६५
ग्रामीण भागातून येणारे कॉल्स ३५
------
कोट
जिल्ह्यात १०८ च्या २३ रुग्णवाहिका धावतात. रुग्णांचा कॉल येताच परिसरातील जवळ असलेली रुग्णवाहिका लगेच जाऊन त्याला रुग्णालयात भरती करीत असते. कोरोनामुळे या रुग्णवाहिकेसाठी मोठ्या प्रमाणात काॅल येत आहेत. त्या सर्वांना सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर