घनश्याम नवघडे
नागभीड : धानाच्या बोनसची रक्कम चिमूर प्रकल्पाला प्राप्त झाली आहे. बोनसची ही रक्कम ८ कोटी ९२ लाख ५ हजार २८५ रुपये आहे. बोनस लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. मात्र, बोनस शेतकऱ्यांना ५० टक्केच मिळणार आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार आहे.
हंगाम तोंडावर आला आहे. मात्र, विक्री केलेल्या धानाच्या बोनसची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता परसली. रोवणीला सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांना खत, ट्रॅक्टर भाडे, रोवणीची मजुरी आदी बाबींसाठी पैशांची नितांत गरज आहे. शासनाने धानाच्या बोनसचे त्वरित वितरण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत होती. माध्यमातून शेतकऱ्यांची ही अस्वस्थता व्यक्त झाल्यानंतर शासनाने बोनसची निम्मी रक्कम देण्याचे मान्य केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या चिमूर २८ आणि गोंडपिपरी प्रकल्पात ४, अशा ३२ आदिवासी सोसायट्यांमार्फत यावर्षी ९ हजार ५१३ शेतकऱ्यांकडून २ लाख ६१ हजार ७१६ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. या शेतकऱ्यांना त्यांच्या धानाची देयके देण्यात आली असली तरी या शेतकऱ्यांना या खरेदीपोटी १८ कोटी ३२ लाख १ हजार रुपये बोनस रक्कम शासनाकडून देय आहे. मात्र, यापैकी ८ हजार ५७२ शेतकरी बोनससाठी पात्र ठरले असून, या शेतकऱ्यांसाठी सध्या ८ कोटी ९२ लाख ५ हजार २८५ रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती चिमूरचे प्रकल्प व्यवस्थापक जी. आर. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असेही राठोड म्हणाले.
बाॅक्स
चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यांतच धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. त्यानंतर शेतकरी धान विक्रीला सोसायट्यांमध्ये आणतात. दोन वर्षांपूर्वी शासनाने आदिवासी विविध कार्यकारी सोसायट्यांना खरेदीचे अधिकार दिले. सोसायट्यांकडून हमीभाव १८६८ रुपये अधिक ५०० बोनस व सानुग्रह अनुदान २०० रुपये दिले जाते. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी आदिवासी महामंडळाच्या केंद्राकडे धान विक्री केली आहे.