आर्थिक संकट : वेतन अदा करण्याची ग्रामसेवकांची मागणीवरोरा : तालुक्यातील ५४ ग्रामसेवकांचे वेतन मागील तीन महिन्यापासून थकीत आहे. वारंवार निवेदने देवूनही थकीत वेतन अदा केले जात नसल्याने ग्रामसेवकांनी कामावर बहिष्कार टाकला आहे. ग्रामसेवकांच्या बहिष्काराचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे.वरोरा तालुक्यात ८१ ग्रामपंचायती असून ५४ ग्रामसेवक कार्यरत आहेत. अनेक ग्रामसेवकांकडे अतिरिक्त ग्रामपंचायतीचा भार देण्यात आला आहे. अतिरिक्त कामाच्या बोझ्यात ग्रामसेवक तारेवरची कसरत करीत आपले कर्तव्य बजावित आहे. मात्र कर्तव्य बजावित असताना वरोरा तालुक्यातील ग्रामसेवक मागील तीन महिन्यापासून वेतनापासून वंचित झाले आहेत. माहे जून २०१५ पासून वेतन थकीत असल्याने याबाबत पंचायत समितीच्या संंवर्ग विकास अधिकारी यांना निवेदनही दिले. त्यानंतरही वेतन मिळाले नसल्याने वरोरा तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसापासून असहकार आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अनेक कामे प्रभाविय झाली आहेत. यानंतर थकीत वेतन मिळाले नाही तर मासीक, पाक्षीक सभेवर बहिष्कार टाकून कोणतेही अहवाल सादर करणार नाही, असा इशाराही महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन वरोरा शाखेच्या वतीने देण्यात आले आहे. थकीत वेतनामुळे ग्रामसेवकांवर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरोरा तालुक्यातील ५४ ग्रामसेवकांचे वेतन तीन महिन्यांपासून थकित
By admin | Updated: September 4, 2015 01:00 IST