कोळसा उत्खनन : ब्लॉस्टिंगने गावकऱ्यांच्या जीवाला धोकाप्रकाश काळे गोवरीवेकोलित कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली स्फोट घडवून ब्लॉस्टिंग केली जाते. या ब्लॉस्टिंगची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढविल्याने अनेक नवीन-जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेले आहेत. वेकोलितील ब्लॉस्टिंगचे भूकंपागत बसणारे धक्के क्षणभर काळजात धडकी भरविणारे आहे. वेळी-अवेळी क्षमता वाढवून केल्या जाणाऱ्या ब्लॉस्टिंगने परिसरातील गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. गोवरी, पोवनी, सास्ती, साखरी, गोयेगाव, अंतरगाव, चिंचोली परिसरातील भूगर्भात दगडी कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात आहे. राजुरा तालुक्यातील कोळशाच्या खाणी देशाच्या नकाशावर तालुक्याची मान उंचावणाऱ्या असल्या तरी कोळसा खाणीतील दुष्परिणामाचा फटका परिसरातील गावांना बसत आहे. बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वेकोलिने नवीन कोळसा खाणीसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली आहे. गोवरी व पोवनी या दोन कोळसा खाणी गावाला अगदी लागून आहेत. वेकोलित केल्या जाणाऱ्या शक्तिशाली ब्लॉस्टिंगने अनेक इमारतींना अल्पावधीतच तडे जावून बहुतांश घरे कोसळणाऱ्या मार्गावर आहे. अनेक घरांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने त्या कोणत्याही क्षणी अंगावर कोसळण्याची भीती गावकऱ्यांना आहे. याबाबत वेकोलिला गावकऱ्यांनी अनेकदा निवेदन देऊन यावर उपाययोजना करण्याचे सांगितले. मात्र वेकोलिच्या मुजोर प्रशासनाने गावकऱ्यांच्या गंभीर बाबीची दखल तर घेतली नाही. उलट कोळसा उत्खननासाठी करण्यात येणाऱ्या ब्लॉस्टिंगची तीव्रता वाढवून वेकोलि परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. वेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या शक्तिशाली ब्लॉस्टिंगने नैसर्गिक भूकंपासारखे बसणारे धक्के आता परिसरातील गावकऱ्यांच्या काळजात क्षणभर धडकी भरविणारे आहे. ब्लॉस्टिंगने परिसरातील बहुतांश गावातील घरांना अल्पावधीतच तडे गेल्याने त्या घरात राहणेही गावकऱ्यांना आता भितीचे वाटू लागले आहे. शक्तिशाली ब्लॉस्टिंगने घर अंगावर कोसळून कोणत्याही क्षणी कुटूंब उद्ध्वस्त होण्याचा धोका गावकऱ्यांना आहे. त्यामुळे गोवरी, पोवनी परिसरातील वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गावातील नागरिक दहशतीत जीवन जगत आहे. मात्र या गावकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी लक्ष का देत नाही, हा प्रश्न गावकऱ्यांना आता दिवसरात्रं छळत आहे. वेकोलित मोठ्या प्रमाणात शक्तिशाली स्फोट घडवून आणल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील बोअरवेलचे खड्डे खचत चालले आहे. लाख रुपये खर्च करून शेतीत सिंचनाची सुविधा करून हरितक्रांतीचे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नपूर्तीची वेकोलिने पार वाट लावली आहे. ब्लॉस्टिंगमुळे बोअरवेलचे खड्डे खचल्याने त्यातून निघणारे पाणी कोळशासारखे काळे आहे. ते दूषित झालेले पाणी गावकऱ्यांना प्यावे लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वेकोलिने स्फोटांची तीव्रता वाढविली
By admin | Updated: December 17, 2015 01:06 IST