घोसरी : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभूर्णा तालुक्यातील नांदगाव - गोंडपिपरी, पोंभूर्णा- चंद्रपूर मार्गावर हा प्रकार सुरू आहे.
वढोलीत पांदण रस्त्याची दैनावस्था
वढोली : बोरगाव पुलाकडून निघणारा ताराचंद कोपुलवार ते विश्वनाथ चुदरी यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्यावर खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य व मोठे खड्डे तयार झाले असून अवागमन करणाऱ्यांना त्रास होत आहे. या समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
केरोसीन अभावी अडचण वाढली
जिवती : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसीन बंद झाल्याने अडचण जात आहे. केरोसीन पुरविण्याची मागणी आहे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतीकडून धूर फवारणी
शंकरपूर : गावात डेंग्यू रोगाचे रुग्ण आढळल्यामुळे ग्रामपंचायती मार्फत फाॅगींग मशीनने धूर फवारणी करण्यात येत आहे. डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप विषाणूंमुळे होतो. डास चावल्या नंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला पसरण्यापासून थांबवू शकतो. त्यासाठी घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळच्या वेळी साठलेले पाणी रिकामे करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे, या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते, असे ग्रामपंचायतीने म्हटले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले
पिंपळगाव (भो) : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने जनसामान्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. सप्टेंबरपासून काही प्रमाणात सुरळीत सुरू झाले ; परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढीला लागल्याने मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी महागाई वाढली आहे.
कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी
मूल : तालुक्यातील बेंबाळ येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची एकच शाखा असल्याने येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावे, अशी मागणी आहे.
बसअभावी प्रवाशांची गैरसोय
शंकरपूर : शंकरपूर-भिसी या मार्गाने एकही बस उपलब्ध नसल्याने बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिसी अप्पर तालुका असून शासकीय कामासाठी येथे जावे लागत आहे. तसेच इतर कामासाठीही नागरिकांना या रस्त्याने जाणे-येणे करावे लागतात. मात्र बस नसल्याने परिसरातील अनेक प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.
फाटकाजवळील कचरा हटवावा
गडचांदूर : येथील रेल्वे फाटकाजवळ असलेला कचरा डेपो बंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जातो. पावसाळा असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
मातीच्या ढिगाऱ्यावर झुडपे वाढली
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. या ढिगाऱ्यावर झुडपी जंगल निर्माण झाले असल्याने धोका होण्याची शक्यता आहे.
नाल्यांचा उपसा करण्याची मागणी
सावरगाव : नागभीड तालुक्यातील जीवनापूर येथील नाल्यांचा उपसा न झाल्याने नाल्या सांडपाण्याने तुंबल्या आहे. काही भागात नालीचे पाणी बाहेर वाहत असून ते लोकांच्या घरात जात आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन नाल्यांचा उपसा करण्याची मागणी होत आहे.
बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार करा
बल्लारपूर : येथून सिरोंचा पर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. हा मार्ग तयार झाल्यास नागरिकांना सोईचे होणार आहे.
सौर ऊर्जेचे कुंपण अनुदानावर द्यावे
चिमूर : शेतकऱ्यांच्या जमिनी जंगलाला लागून आहेत. वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करत आहेत. सौर कुंपण देण्याची मागणी आहे.