वरोरा : चार गावातील नागरिकांच्या खोट्या स्वाक्षरी करुन सरकारी धान्य दुकानदाराच्या विरोधात तहसील कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. मात्र या तक्रारीतील स्वाक्षऱ्या बोगस असल्याची तक्रार करीत चार गावातील नागरिकांनी मंगळवारी वरोरो तहसील कार्यालय गाठले. अशी खोटी तक्रार करून दिशाभूल करणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी या गावकऱ्यांनी आज तहसील दारांकडे केली.वरोरा तालुक्यातील साखरा येथील स्वस्त सरकारी धान्य दुकानातून साखरा, लोधीखेडा, गिरोला आणि पारडी या गावातील रेशन कार्ड धारकांना धान्याचा पुरवठा होतो. मात्र या गावातील काही व्यक्तींची नावे वापरून व खोट्या स्वाक्षरी करून दुकानाबाबत वरोरा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तक्रार केली होती. तक्रारीत तक्रारीत नमुद असलेल्या गावकऱ्यांची साक्ष व जबाब नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आले होते. मात्र आपण रेशन दुकानाबाबत तक्रार केली नसतानाही हा नाहक ससेमिरा मागे लागल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या चारही गावातील शेकडो पुरुष व महिलांनी थेट तहसील कार्यालयात धडक दिली. झालेल्या खोट्या तक्रारीची चौकशी करावी, संबंधित व्यक्तीचा शोध घेवून कारवाईच्या मागणीचे निवेदन अन्न पुरवठा अधिकारी व तहसीलदारांना दिले. (तालुका प्रतिनिधी)
तहसील कार्यालयावर धडकले चार गावांतील ग्रामस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 00:28 IST