पाच महिन्यांपासून नळाला पाणी नाही : दोन किमीवरून आणावे लागते पाणीविनायक येसेकर भद्रावतीतालुक्यातील देऊरवाडा गावातील गेल्या पाच महिन्यांपासून टाकीत पाणी नसल्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे हे गाव तहानेने व्याकूळ झाले आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमिटरची पायपीट करावी लागते. या गावातील भिषण समस्येकडे लक्ष देवून ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समिती, जिल्हा परिषद, वेकोलिी व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करुनसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गावात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.९०० लोकसंख्या असलेल्या या देऊरवाडा गावाला पूर्वी पाण्याचा गाव म्हणून ओळखला जात होता. मात्र या गावाला कोळसा खाणीने वेढले. परिणामी गावातील पाण्याची पातळी खूपच खोल गेली आहे. या गावात पाच हातपंप असून त्यातील चार हातपंप बंद स्थितीत आहेत. सुरु असलेल्या एका हातपंपावर गावकऱ्यांची पाण्यासाठी गर्दी उसळते. मात्र बोअरवेलच्या पाण्याची पातळी अतिशय या पंपातील पाणी खूप खोलवर गेल्याने ते काढण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काहींनी तर बैल बंडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा चालू केला आहे. त्यांना पाणी आणण्यासाठी काहीही साधन नसल्याने डोक्यावर गुंड घेवून दोन किलोमिटर अंतरावरुन पायपीट करत पाणी आणावे लागत आहे.शेतावरुन मोलमजुरी करुन घरी परत आल्यानंतर येथील गावकऱ्यांना पाण्याची विवंचना असते. पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती करावी लागत असल्याचे चित्र या गावात प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर दिसून आले. या गावातील नागरिकांच्या पाण्याविषयी समस्या जाणून घेतल्यानंतर येथील सरपंच सुनिता बल्की यांची भेट घेतली असता, त्या म्हणाल्या, पूर्वी या गावात लोकवर्गणीतून ट्युबवेल खोदण्यात आली होती. ती गेल्या पाच महिन्यांपूर्वी ती निकामी झाल्याने पाण्याच्या टाकीमध्ये येणारे पाणी बंद झाले. त्यामुळे संपूर्ण गावात नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. गावात बिकट पाणी समस्या निर्माण झाली आहे. या बाबत ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांना चंद्रपूर यांना पत्राद्वारे कळविले. संवर्ग विकास अधिकारी यांना पत्र दिले. वेकोलि प्रशासनाला, लोकप्रतिनिधींनासुद्धा त्वरीत चालू करण्यासंबंधी पत्र व्यवहार केला. मात्र याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने संपूर्ण गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.