पठाणपुरा गेटबाहेर जमनजट्टी परिसरात दररोज सकाळी शेकडो नागरिक मॉर्निंग वॉककरिता जातात. या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर धोकादायक आहे. २०१३ मध्ये वेकोलिच्या ओव्हरबर्डनवर तीन बिबट पकडण्यात आले होते. माना परिसरात वाघाचाही वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरात वाढलेले काटेरी बाभूळ याला कारणीभूत ठरत आहेत. बाभळीचे कृत्रिम जंगल तयार झाल्याने वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. वेकोलिच्या संवेदनशील क्षेत्रात दरवर्षी स्वच्छता करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वनविभागाने वेकोलिकडून स्वछता आणि झुडुपे काढण्याची कामे करवून घेण्याची मागणी निवेदनातून केली. आज पहाटे अस्वलीच्या हल्ल्यात जखमी झालेले सुनील लेनगुरे यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. इको-प्रोचे वन्यजीव विभाग प्रमुख नितीन बुरडकर, अनिल अडगूरवार, प्रमोद मलिक, सचिन धोतरे यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
परिसर स्वच्छ होईपर्यंत मॉर्निंग वॉक टाळावे
नागरिकांनी स्वत:ची सुरक्षा लक्षात घेऊन माना, लालपेठ परिसर व पठाणपुरा गेटबाहेर अगदी पहाटे फिरायला जाणे टाळावे. परिसर स्वच्छ होईपर्यंत या परिसरात मॉर्निंग वॉक करू नये, असे आवाहन जागरूक नागरिकांनी केले आहे.