सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
आवाळपूर : कोरपना तालुक्यातील वर्दळीच्या रस्तावरील पुलांची दुरवस्था झाली असून बहुतेक पुलांचे कठडे तुटल्याने कठड्या विना पूल अपघातास आमंत्रण देत आहेत.
राजुरा-कोरपना-आदिलाबाद महामार्गावर असलेल्या धामणगाव, वडगाव, आसन खुर्द, व देवघाट या पुलांना कठडे नसल्यामुळे या महामार्गावर अपघात घडत आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या महामार्गावर वाहतुकीची जास्त प्रमाणात वर्दळ असते. या पुलांची खोली जास्त असल्यामुळे तिथे कठड्यांची जास्त गरज आहे. पुलांच्या काही बाजूचे कठडे अपघातात तुटले असल्यामुळे काही भागास कठडे उरलेो तर काही ठिकाणी कठडेच गायब आहेत.
गडचांदूर नांदा महामार्गावर नांदा व बिबी गावाला जोडणाऱ्या पुलाची अवस्थाही अशीच असल्याचे चित्र अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहे.
याआधीसुद्धा या पुलांवर अपघात झाले असून काहींना जीवास मुकावे लागले आहे तर काहींना कायमच अपंगत्व आले आहे. विशेष म्हणजे, कठडे नसलेल्या पुलांवरून वर्दळीचे प्रमाण जास्त असल्याने अपघाताची शक्यता अधिक बळावली आहे.
बॉक्स
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
अनेक दिवसांपासून या पुलावर कठडे नाही. याची माहिती असूनदेखील बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. कुठे पूल झाडांनी वेढले आहे तर कुठे पुलासमोर कचरा असल्याने पूलच दिसत नाही. बरेच ठिकाणी पुलाला रिफ्लेक्टर लावण्यात आले नाही. यामुळे बांधकाम विभाग किती सजग आहे, यावरून दिसून येते.