दिवसेंदिवस वाहनाच्या अपघाताची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याची शिस्त लागावी, यासाठी वाहतूक विभागातर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र वाहतूक पोलीस चिरीमिरी घेतात, असा नेहमीच आरोप होतो. त्यामुळे ऑनलाईन चालान ही संकल्पना सुरू करण्यात आली. याअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा फोटो काढून त्याला ऑनलाईन चालान पाठविण्यात येते. यासंदर्भात भ्रमणध्वनीवर संदेशही पाठविण्यात येतेा. मात्र या चालानसंदर्भात वाहनचालक गंभीर नसल्याचे दिसून येते. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे एक लाख आठ हजार ५६८ जणांवर कारवाई करून दोन करोड ८९ लाख १६ हजार १५० रुपयाचा दंड आकारला. मात्र केवळ एक करोड ४१ लाख ५४ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल केला. तर एक करोड ४८ लाख ३५ हजार ३५० रुपयाचे ई-चालान अनपेड आहे.
कोट
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांंना ई-चालान पाठविण्यात येते. मात्र अनेकांनी ई-चालान भरले नाही. अशा वाहनचालकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी थकीत ई-चालान त्वरित भरावे.
हृदयनारायण यादव, वाहतूक निरीक्षक