शेतकऱ्यांच्या विधवांना दिलासा : शासन व महसूल कर्मचारी संघटनेचा भाऊबीज उपक्रमअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरनापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून घरच्या कर्त्यांनी मृत्यूला कवटाळले. जीव टाकणारी व्यक्ती गेल्याने कुटुंबावर अंधार वाट पसरली. कुटुंबाचा गाडा समोर नेणाऱ्या व जिद्द, धैर्याने परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना ‘भाऊबिज’ सणाचे महत्त्व ओळखून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी घरोघरी जाऊन बहिणींना अनोखी भेट दिली. या सामाजिक उपक्रमाला महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची तेवढीच साथ मिळाली.चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, गोंडपिंपरी व बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विधवांना ‘माझा भाऊ’ म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ओवाळणी करुन घेत ‘भाऊबिजेची’ वस्तु व नगदी स्वरुपात अल्पशी का होईना बहुमोल भेट दिली. शासनाचा नाविण्यपूर्ण व सामाजिक बांधिलकीला प्रेरणा देणारा उपक्रम कौतुकास्पद ठरला. यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या विधवांना दिलासा मिळाला असून शासन आपल्या दारी याची प्रचिती आली. कोणताही गाजावाजा न करता राबविलेल्या या उपक्रमाने गावकरीही भारावले.आजघडीला शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेती उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे. निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजले आहे. अशातून मार्गक्रमण करताना शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोझा वाढतो. कुटुंबाची घालमेल होते. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्यांच्या राबण्याला अर्थच उरत नाही. जगण्याची ओढ हरवून बसतो. कुटुंबाला सोडून जीवनयात्रा संपविणारे चेकपिपरी येथील नानाजी खारकर, सदाशिव बोरकर, हिवरा येथील गणपत कुत्तरमारे, चेकदरुरचे वासुदेव देठे, पोंभूर्णा तालुक्यातील विजय लोनबले, भिवाजी देशमुख, बल्लारपूर तालुक्यातील विसापूरचे रामू उपरे यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेण्यात आली.जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सोबत बल्लारपूरचे तहसीलदार डी.एम. भोयर, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू धांडे, मनोज आकनूरवार, सुनील तुंगीडवार, शैलेश धात्रक, शरद मसराम, अजय मेकलवार उपस्थित होते. प्रशासनाच्या संयुक्त सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून कठीण प्रसंगी खंबीरतेने उभ्या राहिलेल्या व प्रेम, आपुलकीच्या बळावर संसाराचा सांभाळ करणाऱ्या ताराबाई खारकर, लिलाबाई बोरीकर, वंदना लोनबले, जनाबाई देशमुख, वैशाली गुरनुले, छबु देठे, संगीता कुत्तरमारे व विसापूर येथील आशा उपरे यांनी ‘भाऊबिजे’ ची भेट स्वीकारुन दु:खाला एकवटून ओवाळणी करुन घेतली.-आणि जिल्हाधिकारी गहिवरले...बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे आशा रामू उपरे यांच्या घरी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी गेले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, सरपंच रिता जिलठे, उपसरपंच सुनील टोंगे यांनी कुटुंबाचा व तीन वर्षाच्या मुलीचा परिचय करुन दिला. वडिलोपार्जित जमिनीची विचारपूस केली. त्यावेळी मुलीच्या पालन पोषणासाठी आशाने नोकरीची मागणी केली. मात्र स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देताना जिल्हाधिकाऱ्यांना झोपडीतच गहिवरुन आले.महसूल कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकीप्रशासनात ‘सरकारी काम अन् तीन महिने थांब’ असे सरसकट व उघडपणे बोलले जाते. सामान्य जनता तसाच विचार करते. याला काही प्रमाणात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतील पदाधिकारी अपवाद ठरले आहेत. त्यांना एका कर्मचाऱ्यांच्या बैठकीत समाज उपयोगी कार्य करण्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. न्याय हक्कासाठी लढणारी संघटना लोकोपयोगी कार्यासाठी तत्पर झाली. शेतकऱ्यांच्या विधवांना काही का होईना मदत करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीला जोपासणाऱ्या उपक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची मोलाची साथ मिळाली. त्यानंतर हा उपक्रम भाऊबिजेचे औचित्य साधून राबविण्यातही आला. महसूल कर्मचाऱ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची बहिणींना अनोखी भेट
By admin | Updated: November 14, 2015 01:17 IST