शहरातील फुटपाथवर अनेकांचे अतिक्रमण
चंद्रपूर : पादचाऱ्यांना सुरक्षितरित्या चालण्यासाठी रस्त्याच्या बाजूला फुटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, शहरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग व तुकूम परिसरातील फुटपाथवर काही व्यावसायिक आपली वाहने पार्क करतात. एवढेच नाही तर साहित्यही ठेवतात. त्यामुळे फुटपाथवरून चालणे अवघड झाले आहे.
नेटवर्कअभावी ग्राहकांची डोकेदुखी
चंद्रपूर : जिल्ह्यातील दुर्गम भागात मोबाईल टॉवरची संख्या कमी आहे. त्यामुळे भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात ग्राहक असून, त्यांच्यासाठी जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच दिवसांपासून कव्हरेजची समस्या गंभीर बनली आहे. तालुक्याच्या ठिकाणी तरी टॉवर उभारण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
पथदिव्यांची दुरूस्ती करावी
चंद्रपूर : बालाजी वार्ड, एकाेरी, समाधी वार्डामध्ये काही पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे रात्री बाहेर पडणे कठीण झाले आहे. मनपाने पथदिव्यांची दुरूस्ती करण्याची मागणी या वार्डातील नागरिकांनी केली आहे.
भटक्या श्वानांमुळे नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. शहरातील विविध प्रभाग व मुख्य चौकात श्वानांचा संचार वाढला आहे. शहरात बरेच नागरिक श्वान पाळतात. त्यामुळे त्यांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
रस्त्यावरील साहित्यामुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यांवर बांधकाम साहित्य ठेवल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे हे साहित्य उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे.
अन्नपदार्थांची उघडयावर विक्री सुरूच
चंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री उघड्यावर केली जात असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
नामफलक नसल्याने प्रवासी संभ्रमात
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र, यातील बहुतांश रस्त्यांवर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गावांचे नामफलक लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
गंजवार्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी
चंद्रपूर : येथील गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. आता काही दिवसातच महाविद्यालय सुरु होणार असून, या रस्त्यावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. मात्र, दुर्गंधीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा उचलावा, अशी मागणी होत आहे.
वीजबिलाची दुरूस्ती करावी
चंद्रपूर : शहरातील काही भागातील नागरिकांना महावितरण कंपनीकडून येणाऱ्या बिलांमध्ये अनेक त्रुटी असल्याने ग्राहक वैतागले आहेत. विजेचे जादा बिल तसेच त्याच परिसरातील काही ग्राहकांना चुकीच्या नावाने बिल देण्यात येत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
जुन्या इमारतींसाठी निधीची गरज
चंद्रपूर : शहरातील शासकीय जुन्या इमारतींची दुरुस्ती करून त्यांची देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काही इमारती अतिशय जुन्या झाल्या असतानाही त्यातूनच शासकीय कारभार हाकला जात आहे. त्यामुळे मनपाने या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्वस्त धान्य दुकानात धान्य उपलब्ध
चंद्रपूर : नोव्हेंबर २०२०मध्ये सर्व अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांना दोन रुपये प्रति किलोप्रमाणे १० किलो गहू, एक रुपये प्रति किलोप्रमाणे पाच किलो मका व तीन रुपये प्रति किलोप्रमाणे २० किलो तांदूळ तसेच साखर प्रति शिधापत्रिका २० रुपये प्रतिकिलो दराने एक किलो मिळणार आहे. हे धान्य सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेंद्र दांडेकर यांनी दिलीे.
बाबूपेठ परिसरात कचऱ्याचे ढिगारे
चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ व नगिना बाग परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. दिवाळी असल्याने प्रत्येक घरात स्वच्छता केली जात आहे. काही ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने बरेचजण मोकळ्या जागेवरच कचरा टाकतात. हा कचरा उचलण्यात आलेला नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
स्वच्छतादुतांच्या समस्या कायमच
चंद्रपूर : सरकारच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य व महात्मा फुले योजना राबविल्या जातात. या योजनांची जिल्ह्यात योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सफाई कामगारांच्या समस्या सुटलेल्या नाहीत, असा आरोप या कामगारांच्या संघटनेने निवेदनातून केला आहे. सफाई कामगारांना योजनांचे लाभ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
रय्यतवारी नाल्याचे बांधकाम करावे
चंद्रपूर: नेहरूनगर रय्यतवारी परिसरात नाल्याचे बांधकाम न झाल्याने वार्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरातील लोकसंख्या वाढत असल्याने नागरी सुविधांमध्येही वाढ करणे गरजेचे आहे. मनपाने निधीची तरतूद करून नाल्याचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.