शहरातील फुटपाथवर अनेकांचे अतिक्रमण
चंद्रपूर : पादचाऱ्यांना सुरक्षितरीत्या चालण्यासाठी रस्त्याच्या बाजूला फुटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, शहरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग व तुकूम परिसरात मार्गावर असलेल्या फुटपाथवर काही व्यावसायिक आपले वाहने पार्क करतात. एवढेच नाही, तर साहित्यही ठेवतात. त्यामुळे फुटपाथवरून चालणे अवघड झाले आहे.
नेटवर्कअभावी ग्राहकांची डोकेदुखी
चंद्रपूर : जिल्ह्यातील दुर्गम भागात विविध मोबाइल टॉवरची संख्या कमीच आहे. त्यामुळे भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात ग्राहक असून, जास्तीतजास्त टॉवर उभारण्याची आवश्यकता आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून कव्हरेजची समस्या गंभीर बनली आहे. तालुक्याच्या ठिकाणी तरी टॉवरची निर्मिती करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. शहरातील विविध वॉर्ड व मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला आहे. दरम्यान, शहरात बरेच नागरिक श्वानांचे पालन करतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
नाम फलक नसल्याने प्रवाशी संभ्रमात
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र, यातील बहुतांश रस्त्यावर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
गंजवार्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी
चंद्रपूर : येथील गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. आता काही दिवसांतच महाविद्यालय सुरू होणार असून, या रस्त्यावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. मात्र, दुर्गंधीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी होत आहे.
वीजबिलाची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरातील काही भागांतील नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून येणाऱ्या बिलांमध्ये अनेक त्रुटी असल्याने ग्राहक वैतागले आहेत. विजेचे जादा बिल, तर त्याच परिसरातील काही ग्राहकांना चुकीच्या नावाने बिल देण्यात येत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
बाबूपेठ परिसरात कचऱ्याचे ढिगारे
चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ व नगिनाबाग परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. कोरोनामुळे प्रत्येक घरात स्वच्छता केली जात आहे. काही ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने, बरेच जण मोकळ्या जागेवर कचरा टाकतात. हा कचरा उचलण्यात आला नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शहरात डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
कोरोना सावटामुळे पालकांची चिंता वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. दरम्यान, दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता पालकांची चिंता वाढली असून, विद्यार्थी परीक्षेसाठी कसे जातील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंत सध्या शाळा सुरू आहे. मात्र, अजूनही पालकांमध्ये दहशत आहे. काही पालक आजही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या मानसिकतेत नाही.
उघडे चेंबर ठरत आहेत धोकादायक
चंद्रपूर : शहरात अनेक ठिकाणी उघडे चेंबर आहेत. हे चेंबर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. येथून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते.
एटीएममध्ये सुरक्षारक्षक नियुक्त करावे
चंद्रपूर : शहरातील विविध भागांमध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरू केली आहे. ग्राहक याचा लाभही घेत आहेत. मात्र, काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकच नसल्याचे दिसून येत आहे.
दाताळा परिसरात शेणखताचे ढिगारे
चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या दाताळा गावपरिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेलाच शेणखताचे ढिगारे असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला असल्याचे दिसून येते.
ध्वनिप्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : वाहनांवर कर्णकर्कश हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी आहे. मात्र, पाहिजे तशी अंमलबजावणी होत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
अंगणवाडी केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव
चंद्रपूर : ग्रामीण, तसेच शहरी भागातील काही अंगणवाडी केंद्राची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.